नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची लूट, सीबीआयने दाखल केला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:34 AM2018-02-11T00:34:50+5:302018-02-11T00:35:04+5:30
सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून लोकांना लाखो रुपयांना फसविल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय व मुंबई महसूल आयुक्तांच्या नावावर बनावट दस्तऐवज बनवून उत्तरप्रदेश, बिहार व हरयाणाच्या लोकांना फसविले, असे आढळून आले आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून लोकांना लाखो रुपयांना फसविल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय व मुंबई महसूल आयुक्तांच्या नावावर बनावट दस्तऐवज बनवून उत्तरप्रदेश, बिहार व हरयाणाच्या लोकांना फसविले, असे आढळून आले आहे.
या प्रकरणात उत्तर प्रदेशतील लखनौतील काशीनाथ तिवारी व आगºयाचा प्रियंक वर्मा या दोघांना सीबीआयने मुख्य आरोपी केले आहे. या दोघांनी खासगी संस्था या सरकारी असल्याचे भासवत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लुबाडण्यासाठी पीएमओ व अर्थमंत्रालयाच्या नावांचा वापर केला.
सीबीआयच्या माहितीनुसार आरोपींनी ‘राष्ट्रीय कृषि आयात निर्यात परिषद’ अशी खासगी संस्था स्थापन केली होती. लोकांना ही संस्था म्हणजे सरकारी उपक्रम आहे, असे भासविले होते. सीबीआयने तपास केला असता, त्या दोघांनी लोकांकडून पैसा उकळण्यासाठी त्यांना खोटे दस्तऐवजही दाखविले, असे आढळले.