जैन धर्मियांचे श्रद्धास्थान भगवान बाहुबली! भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, २६ तारखेला महाउत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 04:20 PM2024-01-22T16:20:02+5:302024-01-22T16:20:47+5:30

Pran Pratishtha Ceremony: अयोध्येशी निकटचा संबंध असलेल्या भगवान बाहुबली यांच्या भव्य प्रतिमेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

lord bahubali prana pratishtha ceremony of jain digambar community on 26 january 2024 | जैन धर्मियांचे श्रद्धास्थान भगवान बाहुबली! भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, २६ तारखेला महाउत्सव

जैन धर्मियांचे श्रद्धास्थान भगवान बाहुबली! भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, २६ तारखेला महाउत्सव

Pran Pratishtha Ceremony: भारतात विविध धर्मियांच्या संस्कृती, परंपरा अगदी प्राचीन काळापासून गुण्यागोविंदाने नांदतात. भारताची ओळख ही विविधतेत एकता असल्याचे म्हटले जाते. अगदी याचाच प्रत्यय जानेवारी महिन्यात येत आहे. एका बाजूला अयोध्येत राम मंदिर सोहळा होत असून, दुसरीकडे गुजरातमध्ये जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाहुबली यांच्या एका भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव अंतर्गत केली जाणार आहे. विशेष योगायोग म्हणजे भगवान बाहुबली यांचा जन्म अयोध्येतील आहे. 

जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांचे बाहुबली हे पुत्र आहेत. ऋषभदेव यांना श्रीकृष्णानंतर विष्णूचा २२ वा अंश अवतार मानले जाते. याचा उल्लेख नारायण कवचमध्ये आढळून येतो. बाहुबली हे ऋषभदेव आणि सुनंदा यांचे पुत्र असून, त्यांचा जन्म इक्षवाकु कुळात अयोध्येत झाला. लहानपणापासूनच बाहुबली हे विविध कलांमध्ये, शास्त्रांमध्ये अतिशय पारंगत होते. ऋषभदेवांनी संन्यास घेतल्यानंतर आपल्या राज्याची सर्व मुलांमध्ये वाटणी केली. बाहुबली यांनी अम्सक हा भाग मिळाला. पोदनपूर ही त्यांची राजधानी होत. मात्र, भरत चक्रवर्ती यांच्याशी झालेल्या युद्धानंतर बाहुबली यांना वैराग्य आले आणि सर्वस्वाचा त्याग करून ते दिगंबर मुनी बनले. बाहुबली यांनी एक वर्ष कोणतीही हालचाल न करता, अन्नाचा एकही दाणा न खाता, अतिशय कठोर तपस्या केली. यानंतर त्यांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली. बाहुबली यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला. 

गुजरातमधील सोनगड येथे ७ दिवसांचा भव्य कार्यक्रम

भगवान बाहुबली यांच्या कर्नाटकातील श्रवणबेलगोला, करकल, धर्मस्थल, वनुर आणि गोमटगिरी येथे मोठ्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातही भगवान बाहुबली यांची एका जैन मंदिरात मूर्ती स्थापन करण्यात आली असून, अनुयायी वर्ग मोठा आहे. आता गुजरातमधील सोनगड येथे भव्य सोहळ्यात भगवान बाहुबली यांच्या उंच मूर्तीचे अनावरण केले जाणार आहे. १९ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत ७ दिवस दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, शोभायात्र, धार्मिक गुरूंची प्रवचने, मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम सुरू आहे. ज्ञायक संकल्प - धर्म ध्वजारोहण इंद्र प्रतिष्ठा, ज्ञायक नि:शंकता - गर्भ कल्याणक पूर्व क्रिया, ज्ञायक अवधारणा - गर्भ कल्याणक दिवस, ज्ञायकता आविर्भाव - जन्म कल्याणक दिवस, ज्ञायकता अभिवृद्धी - तप कल्याणक दिवस, ज्ञायकता पूर्णता - ज्ञान कल्याणक दिवस, ज्ञायकता अनंतता - मोक्ष कल्याणक दिवस हे झाल्यानंतर शुक्रवार, २६ जानेवारी रोजी भगवान बाहुबली यांच्या भव्य मूर्तीवर महामस्तकाभिषेक होणार आहे. 

दरम्यान, श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट, सोनगड यांच्या वतीने या सात दिवसांच्या महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण महोत्सवाच्या आयोजनात सिंहाचा वाटा उचलणारे निमंत्रक नेमिषभाई शाह प्रमुख निमंत्रक आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा अनुभव घ्यावा, गुरूंचे मार्गदर्शन आशिर्वचन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: lord bahubali prana pratishtha ceremony of jain digambar community on 26 january 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात