"अयोध्येत राम आले, बिहारमध्ये पलटूराम..."; संजय राऊतांचा नितीश कुमारांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 04:53 PM2024-01-28T16:53:00+5:302024-01-28T16:53:18+5:30
Sanjay Raut Slams Nitish Kumar : संजय राऊत यांनी नितीश कुमारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं म्हटलं.
नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची आरजेडी आणि जेडीयू यांच्या सरकारमधील आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सोपवला आहे. तसेच, भाजपासोबत नव्याने सरकार स्थापनेचा दावा देखील केला आहे. जेडीयूच्या बैठकीनंतर या घडामोडी घडल्या. याच दरम्यान संजय राऊत यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. "अयोध्येत राम आले, बिहारमध्ये पलटूराम..." असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी नितीश कुमारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं म्हटलं. "इंडिया आघाडीची स्थिती उत्तम आहे. ममता बॅनर्जी अजून बाहेर गेलेल्या नाहीत. आम आदमी पक्षही वेगळा झालेला नाही. फक्त नितीश कुमारांचा हा खेळ सुरू आहे. त्याचं मानसिक आरोग्य चांगलं नाही. आम्ही त्यांना खूप दिवसांपासून जवळून ओळखतो."
"गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यामागे काही वैयक्तिक कारणं असू शकतात. मला वाटत नाही की, नितीश कुमार आमच्यापासून दूर गेल्याने बिहारच्या राजकारणात काही फरक पडेल. काँग्रेस, तेजस्वी यादव आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. केरळ आणि बंगालप्रमाणे पंजाबमधील परिस्थिती वेगळी आहे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"मी काम करत होतो पण..."; नितीश कुमारांनी सांगितली 'मन की बात'
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, माझ्या पक्षाचं मत लक्षात घेतल्यानंतर मी राजीनामा दिला. सरकारच्या सर्व कामांचे श्रेय ते (आरजेडी) घेत आहे, मी काम करत होतो पण मला काम करू दिलं जात नव्हतं, दोन्ही बाजूंनी त्रास होता.