प्रभू राम हे तर आपले पूर्वज; पूर्वजांचे स्मरण हे भारतीयत्व! मिर्झापूरचे मोहम्मद हबीब झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 02:14 PM2024-01-08T14:14:14+5:302024-01-08T14:14:51+5:30

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे कार सेवक, समाजसेवक आनंदी

Lord Rama is our ancestor; Remembering ancestors is Indianness! Mohammad Habib of Mirzapur became emotional | प्रभू राम हे तर आपले पूर्वज; पूर्वजांचे स्मरण हे भारतीयत्व! मिर्झापूरचे मोहम्मद हबीब झाले भावुक

प्रभू राम हे तर आपले पूर्वज; पूर्वजांचे स्मरण हे भारतीयत्व! मिर्झापूरचे मोहम्मद हबीब झाले भावुक

लखनौ : जेव्हा तांदळाचे काही कच्चे दाणे (अक्षता) आणि राम मंदिराच्या चित्रासह एक पत्र आले तेव्हा मिर्झापूरचे मोहम्मद हबीब भावुक झाले. हबीब यांनी भाजपची विविध पदे भूषवली आहेत. हबीब म्हणाले की, ते आपल्या घरून टीव्हीवर हा सोहळा पाहणार आहे. हा प्रत्येकासाठी ऐतिहासिक दिवस असेल. मी भाजपचा जुना सदस्य आहे. जवळपास ३२ वर्षांनी निकाल मिळाला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. प्रभू राम हे आपले पूर्वज असून पूर्वजांचे स्मरण करणे हे भारतीयत्व आहे, असे हबीब म्हणाले.

वडिलांच्या निधनानंतर सुरू ठेवला खटला

  • अन्सारी आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या १०० वर्षांपासून अयोध्येत राहत आहे. ते म्हणाले की, अयोध्येत जे काही घडत आहे ते ऐतिहासिक आहे. मंदिर नगरीत विकास होत असल्याचे ते म्हणाले.
  • इक्बाल यांचे वडील हाशिम अन्सारी, हे जमीन वाद प्रकरणातील सर्वात जुने वकील होते, त्यांचे २०१६ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर इक्बालने न्यायालयात खटला सुरू ठेवला.


राम कणाकणात...

राम हे कणाकणात आहेत. आम्ही आमचा धर्म बदलू शकतो. मात्र, आम्ही आमचे पूर्वज बदलू शकत नाही. भगवान रामाची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यापेक्षा आनंदाची कोणतीही गोष्ट असू शकत नाही, असे अन्सारी म्हणाल्या.

अयोध्या शांततेचे प्रतीक

  • आम्ही टीव्हीवर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहणार आहोत. मात्र राम मंदिर-बाबरी मशीद वाद प्रकरणी मुस्लीम बाजूचे प्रतिनिधित्व करणारे अयोध्येचे इक्बाल अन्सारी हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 
  • त्यांना  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अधिकृत निमंत्रण मिळाले आहे. अयोध्या नेहमीच गंगा-जमुनी तहजीबचे (शांततापूर्ण सहजीवनाची संस्कृती) प्रतीक राहिले आहे. 
  • जी सद्भावना अयोध्येत आहे ती माझ्यातही आहे, असे अन्सारी म्हणाले.


राम ज्योती हिंदू आणि मुस्लीम कुटुंबे तेवत ठेवणार

  1. वाराणसी जिल्ह्यात मुस्लीम महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या, स्वतःची मुस्लीम महिला फाउंडेशन चालवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन अन्सारीदेखील आनंदी आहेत.
  2. त्यांची सहकारी नजमा यांनी अयोध्येतून राम ज्योती (विशेष दिवे) आणून वाराणसीतील ४००-५०० कुटुंबांमध्ये (हिंदू आणि मुस्लीम दोन्ही) वाटण्याचे ठरवले आहे. २२ जानेवारीपर्यंत हे दिवे तेवत ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.


सांगलीचा कलाकार अयोध्येत रांगोळी रेखाटणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मांगले (जि. सांगली) : अयोध्येत २२ जानेवारीस श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सांगलीकर कलाकारांचाही सहभाग असणार आहे. कांदे (ता. शिराळा) येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार सुनील कुंभार उत्सवस्थळी चित्ताकर्षक रांगोळी रेखाटणार आहेत. सुमारे दोन टन रंगीबेरंगी रांगोळीतून ते उत्सवाचा माहोल जिवंत करणार आहेत.
यासाठी ते येत्या बुधवारी अयोध्येला रवाना होणार आहेत.

या रेखाटनासाठी कुंभार यांनी दोन टन रांगोळी खरेदी केली आहे. राममंदिर परिसरासह संपूर्ण अयोध्यानगरी रांगोळीमय करण्याचा त्यांचा मानस आहे. १६ ते २२ जानेवारी या सहा दिवसांच्या कालावधीत त्यांचे अखंड रांगोळी रेखाटन चालेल. या कामी ग्रामस्थांनीही त्यांना देणगी स्वरूपात रांगोळी देऊ केली आहे.

अनेकरंगी चित्राविष्कार हे त्यांच्या रांगोळीचे वैशिष्ट्य

गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार यांनी रांगोळीकला जोपासली आहे. विविध धार्मिक सोहळे, उत्सव या काळात मंदिरांसमोर देखण्या रांगोळ्या रेखाटून लक्ष वेधून घेतात. आकर्षक रंगसंगती, रांगोळीचे मुक्त फटकारे आणि अनेकरंगी चित्राविष्कार हे त्यांच्या रांगोळीचे वैशिष्ट्य आहे.

Web Title: Lord Rama is our ancestor; Remembering ancestors is Indianness! Mohammad Habib of Mirzapur became emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.