जास्त बँक खाती असल्यास तोटा...काय आहेत नियम?, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 11:17 AM2022-08-07T11:17:27+5:302022-08-07T11:17:34+5:30
बँक खात्यात १२ महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही, तर बँक ते खाते निष्क्रिय घोषित करते.
अनेक वेळा लोक त्यांच्या सोयीनुसार घराजवळ असलेल्या बँकेत खाते उघडतात, तर घर बदलल्यानंतर दुसऱ्या बँकेत खाते उघडतात. अशा स्थितीत आपण आधीच्या खात्याकडे विशेष लक्ष देत नाही. परंतु यात तुमचे खाते सक्रिय राहते, त्याचा फटका बसतो. त्या सर्व खात्यांचे तपशील प्राप्तिकर विभागाकडे असतात.
काय आहेत नियम?
बँकेच्या नियमांनुसार, बँक खात्यात १२ महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही, तर बँक ते खाते निष्क्रिय घोषित करते. दुसरीकडे, जर २४ महिन्यांपर्यंत बँकेत कोणताही व्यवहार झाला नाही, तर बँक खाते डॉरमेंट खाते म्हणून घोषित करते. अशा परिस्थितीत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल बँक शुल्क आकारते. दीर्घकाळ कोणताही व्यवहार न केल्यास आणि किमान शिल्लक न ठेवल्यास, सेवा शुल्क म्हणून बँकेला मोठी रक्कम द्यावी लागू शकते.
‘ते’ अकाऊंट बंद करा
नोकरी बदलल्यावर, प्रत्येकाला नवीन कंपनीने सांगितलेल्या बँकेत पगार खाते उघडावे लागते. अशा परिस्थितीत, जोपर्यंत पगार बँक खात्यात येत राहतो तोपर्यंत ठीक आहे, परंतु जेव्हा पगार येणे थांबते तेव्हा बँक या पगार खात्याचे बचत खात्यात रूपांतर करते आणि किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल शुल्क आकारते. हे टाळण्यासाठी बँक खाते बंद करावे, खाते बंद करण्यापूर्वी खात्यातून सर्व पैसे काढावे लागतील, त्यानंतर बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज करून सांगावे लागेल. त्यानंतर बँक तुमचे खाते बंद करेल.