लुप्त झाली चांदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 02:52 AM2018-02-26T02:52:57+5:302018-02-26T02:52:57+5:30
नाव : श्री अम्मा यंगर
अय्यपन उर्फ श्रीदेवी
जन्म : १३ आॅगस्ट १९६३
जन्मस्थळ : तामिळनाडूतील शिवकाशी
कौटुंबिक पार्श्वभूमी : श्रीदेवी यांचे वडील पेशाने वकील होते. त्यांना १ सख्खी आणि २ सावत्र बहिणी आहेत. १९९६ साली निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.
पुरस्कार : त्यांना ‘पद्मश्री’, तसेच केरळ सरकारच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते, तसेच तब्बल ५ वेळा त्यांनी ‘फिल्म फेअर’ पटकाविला.
भाषा : हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम भाषांतील चित्रपटांत अभिनय.
मराठीशी ‘नाते’!
‘श्वास’ चित्रपटाला ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाल्यानंतर मराठी चित्रपटांमध्ये काही वेगळे घडते आहे, अनेक प्रयोग होत आहेत, याची जाणीव हिंदी, तसेच अन्य भाषांतील चित्रपट निर्मात्यांनाही होऊ लागली. श्रीदेवी ही मूळची दाक्षिणात्य राज्यातील असली, तरी तिचे हिंदी चित्रपटांतील करिअर मुंबईतच घडल्याने व बोनी कपूरशी विवाह झाल्यानंतर ती मुंबईकरच झाली होती. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहांशी ती लांबून का होईना, पण परिचित होती.
‘टपाल’चे कौतुक
भारतीय टपाल खात्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून लक्ष्मण उतेकर यांनी ‘टपाल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. २०१४ साली त्या चित्रपटाच्या प्रीमियरला बोनी कपूर, श्रीदेवी व तिची मुलगी जान्हवी हे उपस्थित राहिले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर श्रीदेवीने टिष्ट्वट केले होते की, ‘टपाल’ चित्रपट पाहिला. खूप दिवसांनंतर डोळ्यांत पाणी आले. प्रत्येकाने बघावा, असा हा चित्रपट आहे.
‘नकले’ला मनमोकळी दाद
‘मराठी तारका’ हा महेश टिळेकर सादर करीत असलेला अतिशय रंगतदार कार्यक्रम. या कार्यक्रमाला एकदा श्रीदेवी व माधुरी दीक्षित दोघी एकाच वेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनी विविध चित्रपटांतील श्रीदेवीच्या गाण्यांवर नृत्याविष्कार पेश केला होता. त्याचे श्रीदेवीने तोंडभरून कौतुक केले होते. किशोरी गोडबोले हिची अजून एक ओळख म्हणजे ती श्रीदेवीची उत्तम नक्कल करते. तिने ‘मराठी तारका’ या कार्यक्रमात श्रीदेवींची त्यांच्यासमोर फर्मास नक्कल केली होती. त्या अदाकारीलाही श्रीदेवीने मनमोकळी दाद दिली होती. असाच दुसरा किस्सा आहे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा. त्यात बोनी कपूर व श्रीदेवी दोघेही सहभागी झाले होते. त्या वेळी अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी श्रीदेवीची उत्तम नक्कल केली होती. त्यालाही तिने मनमुराद दाद दिली होती.
मराठी चित्रपटात काम करायचे होते.
माधुरी दीक्षित जसे आता एका मराठी चित्रपटात काम करीत आहे, तसे श्रीदेवी मराठी चित्रपटात काम करणार, याची अनेकांना उत्सुकता होती. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘अग बाई अरेच्चा-२’ हा चित्रपट २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे म्युझिक लाँच अहमदनगर येथील एका समारंभात श्रीदेवीच्या हस्ते झाले होते. त्या वेळी बोलताना ती म्हणाली होती की, मला मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, पण तसा योग आजवर काही आला नव्हता. आता तिच्या निधनाने तीही शक्यता दुरावली.
जगली मराठी गृहिणीची भूमिका
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या व गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदी चित्रपटात श्रीदेवीने साकारलेले शशी गोडबोले या मराठी गृहिणीची भूमिका कौतुकाचा विषय ठरली होती. ही भूमिका करण्यासाठी तिने मराठी महिलांची जीवनशैली कशी असते, याचे बारीकसारीक तपशील समजून घेतले होते.
३ वर्षांपूर्वी बचावल्या होत्या
३ वर्षांपूर्वी एका भीषण अग्निकांडातून श्रीदेवी थोडक्यात बचावल्या होत्या. ही आग इतकी भीषण होती की, त्यात श्रीदेवी यांचा बेडही जळून खाक झाला होता. नोव्हेंबर २०१३ सालची ही घटना. श्रीदेवी व बोनी कपूर यांच्या अंधेरीस्थित बंगल्याला संध्याकाळी अचानक आग लागली. ही आग लागली, तेव्हा श्रीदेवी दोन्ही मुली जान्हवी व खुशीसोबत बंगल्यात होत्या. सुदैवाने तिघींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश
आले होते.
महिला कलाकार केवळ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाता असताना, ‘सिनेतारका’ म्हणून सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याचा पहिला मान श्रीदेवी यांना मिळाला. हे ‘स्टारडम’ त्यांनी दिलखेच अदाकारी, नृत्यकौशल्य व दमदार अभिनयाच्या जोरावर मिळविले. चौथ्या वर्षी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून सुरू झालेला या लखलखत्या ‘तारके’चा चंदेरी प्रवास गेली ५० वर्षे सुरू होता. हा मूळचा विनयशील चंदेरी वृक्ष ‘पद्मश्री’, ‘फिल्मफेअर’सारखे अनेक सन्मान, चाहत्यांचे अविरत प्रेम, यशाची झळाळी या जीवन फलिताच्या भाराने आणखीनच विनम्र झाला. यशाच्या शिखरावर असतानाही सभोवतालच्यांना न दुखावणारी ही चांदणी सिनेअवकाशातून अलगद निखळली, तरीही सोबती आणि चाहत्यांच्या मनोवकाशात ती त्याच तेजाने अखंड चमचमत राहणार आहे.
कारकिर्द-
1967
वयाच्या चौथ्या वर्षी ‘थुनैवन’ या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण.
1971
८व्या वर्षी ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा केरळ सरकारचा पुरस्कार.
1975
वयाच्या १२व्या वर्षी ‘ज्युली’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण.
1976
१३व्या वर्षी ‘मूंद्रू मुदिचू’ या तामिळ चित्रपटात प्रौढ कलाकार म्हणून पदार्पण.
1978
वयाच्या १५व्या वर्षी प्रौढ कलाकार म्हणून ‘सोलवा सावन’ हा पहिला बॉलीवूडपट.
1983
‘हिम्मतवाला’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण झाली.
1983 : सदमा
1983 : हिम्मतवाला
1983 : जस्टिस चौधरी
1983 : मवाली
1983 : कलाकार
1984 : तोहफा
1986 : नगिना
1986 : आग और शोला
1986 : कर्मा
1986 : सुहागन
1987 : औलाद
1987 : मिस्टर इंडिया
1989 : निगाहे
(नगिना भाग 2)
1989 : चांदनी
1989 : चालबाज
(फिल्मफेअर :
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री)
1991 : फरिश्ते
1991 : लम्हे
(फिल्मफेअर :
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री)
1992 : खुदा गवाह
1992 : हीर रांझा
1993 : रूप की रानी चोरों का राजा
1993 : गुमराह
1993 : चंद्रमुखी
1994 : लाडला
1997 : जुदाई
2004 : मालिनी अय्यर
(मालिकेतून छोट्या पडद्यावर)
2008 : लॅक्मेच्या रॅम्पवर
2012 : इंग्लिश विंग्लिश
2017 : ‘मॉम’
(तीनशेवा व अखेरचा चित्रपट)
गाजलेली गाणी-
ऐ जिंदगी, गले लगा ले (सदमा)
गोरी तेरे अंग अंग मे (तोहफा)
मैं तेरी दुश्मन (नगिना)
हवा हवाई (मि. इंडिया)
काटे नही कटते (मि. इंडिया)
ना जाने कहा से आई है (चालबाज)
नैनो में सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
रंग भरे बादल से... चांदनी (चांदनी)
मोरनी बागा मां (लम्हे)
मेरी बिंदिया (लम्हे)
मैं रूप की रानी तू चोरों का राजा (रूप की रानी चोरों का राजा)
तू ना जा मेरे बादशाह (खुदा गवाह)
प्यार प्यार करते करते (जुदाई)
गौवराई माझी (इंग्लिश विंग्लिश)
श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. अनेक चाहत्यांची मने दुखावून त्या अकाली निघून गेल्या. त्यांचे ‘मूंद्रम पीराई’, ‘लम्हे’ आणि ‘इंग्लिश-विंग्लिश’सारखे सिनेमे इतर अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती.
त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
श्रीदेवी यांनी गेल्या अर्धशतकी कारकिर्दीत हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांतून अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका तितक्याच समर्थपणे साकारल्या. अभिनय, सौंदर्य आणि कलानिपुणता यांचा अनोखा संगम असलेल्या श्रीदेवी यांनी रूपेरी पडद्याला खºया अर्थाने ग्लॅमर प्राप्त करून दिले.
- देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री.
त्या अभिनयाचे प्रेरणास्रोत होत्या. त्यांची यशस्वी कारकिर्द अचानक
संपुष्टात आली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत.
- स्मृती इराणी, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री.
मी अतिशय व्यथित झालो आहे. एक अतिशय जवळची मैत्रीण आणि इंडस्ट्रीतील एका लिजेंडला गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. मी त्यांचे दु:ख समजू शकतो.
- रजनीकांत, अभिनेता.
ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या प्रतिभेने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्या सर्वोत्तम अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. - हेमा मालिनी, अभिनेत्री.
या बातमीने मी अतिशय व्यथित झालो आहे. हे असे अचानक कसे झाले, याचा मी विचार करतो, तेव्हा माझ्या मनाला तीव्र वेदना होतात. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्या शूटिंगच्या सेटवर आमच्यासाठी जेवण आणायच्या. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी आपल्याला मदत करावी लागेल.
- धर्मेंद्र, अभिनेता.
या अकाली एक्झिटमुळे सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्या अतिशय सामान्य राहायच्या. त्यांना भेटताना कधी आपण एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला भेटतोय, असे वाटायचे नाही. नव्या कलाकारांनी त्यांचे सिनेमे पाहून आदर्श घ्यावा.
- सुभाष घई, दिग्दर्शक.
या घटनेवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्यांनी अनेक सिनेमांतून लिजेंड्री भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, याचे मला अतिशय दु:ख होत आहे. मी त्यांच्या ‘चांदनी’ सिनेमाचा इतका मोठा चाहता होतो की, माझ्या एका सिनेमाचे नावही ‘चांदनी बार’ ठेवले.
- मधुर भांडरकर, दिग्दर्शक.
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका प्रतिभावान अभिनेत्रीचा शेवट झाला आहे. सिनेविश्वाने एक अभिनयसंपन्न अभिनेत्री गमावली आहे. सिनेसृष्टी त्यांचे योगदान कधीही विसरणार नाही. त्यांच्या जाण्याने खूप मोठी हानी झाली आहे.
- माधुरी दीक्षित, अभिनेत्री.
- (समीर परांजपे)