कौतुकास्पद! कोरोनामुळे नोकरी गेली, हार नाही मानली, सुरू केली फॅक्ट्री; अनेकांना दिला रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 10:29 AM2023-09-23T10:29:37+5:302023-09-23T10:30:12+5:30
कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा सर्व कामं ठप्प झाली तेव्हा श्याम सुंदर साह घरी परतले आणि स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि मिठाईची फॅक्ट्री काढली.
कोरोनामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एकेकाळी बंगालमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या श्याम सुंदर यांच्यासाठी लॉकडाऊन वरदान ठरलं आहे. मजुरीचं काम सोडून ते कटिहार या गावी परतले आणि रसगुल्ला बनवण्याची फॅक्ट्री काढली. आज कटिहार, पूर्णिया, भागलपूरसह बंगालमध्ये रसगुल्ल्याचा पुरवठा केला जातो. रोज पाच क्विंटल रसगुल्ल्याचा पुरवठा होतो. यामुळे महिन्याभरात चांगलं उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर त्यांनी अनेकांना रोजगारही दिला आहे. श्याम सुंदर दररोज 80 हजार रुपयांच्या रसगुल्ल्याची विक्री करतात.
कटिहारच्या सौरिया पंचायतीच्या सिहला गावातील श्याम सुंदर साह यांची गोष्ट ही लोकांना हार न मानण्याची प्रेरणा देते. कटिहारच्या डंडखोरा ब्लॉकमध्ये मिठाई बनवण्याची फॅक्ट्री सुरू करून ते दररोज 5 क्विंटल मिठाईचा पुरवठा करत आहेत. या कामात त्यांची पत्नी रीता देवी त्यांना पूर्ण सहकार्य करते. कोरोनाच्या आधी श्याम सुंदर साह बंगालमधील एका कारखान्यात रोजंदारी मजूर म्हणून काम करायचे. पण कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा सर्व कामं ठप्प झाली तेव्हा श्याम सुंदर साह घरी परतले आणि स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि मिठाईची फॅक्ट्री काढली.
श्याम सुंदर साह अवघ्या चार रुपयांत मिठाई तयार करतात आणि संपूर्ण कटिहार जिल्हा तसेच शेजारील जिल्हे आणि बंगालमध्ये होलसेल पुरवठा करतात. ते येथे 160 रुपये किलो दराने मिठाई विकतात. अशा स्थितीत दररोज 80 हजार रुपयांची विक्री होते. त्यामुळे त्यांचा रोजगारही चांगला चालला आहे. त्यांच्या फॅक्ट्रीत सध्या अनेक लोक काम करतात.
शासनाकडून सहकार्य मिळाल्यास या फॅक्ट्रीचा विस्तार करून 50 ते 100 जणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, असे श्याम सुंदर सांगतात. या व्यवसायात श्याम सुंदर यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी रिता देवी सांगतात की, त्यांचे पती पूर्वी राज्यात इतरत्र मजुरीचं काम करायचे आणि आता स्वत: फॅक्ट्री सुरू करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. अनेकांना यामुळे खूप दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.