द्रष्टा उद्योगपती, सच्चा देशभक्त गमावला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:35 AM2022-02-13T11:35:51+5:302022-02-13T11:38:03+5:30
व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत -
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगताची अपरिमित हानी झाली आहे. ते केवळ द्रष्टे उद्योगपती नव्हते तर सच्चे देशभक्त होते. सामाजिक हितासाठी ते आपल्या उक्ती आणि कृतीतून आयुष्यभर झटत राहिले. त्यांनी कायम सत्याची कास धरली. वैयक्तिक लाभ, स्वार्थापलीकडे जाऊन त्यांनी देशविकासासाठी कार्य केले. संसदेत ते माझे सहकारी होते. पक्षीय राजकारणाचा विचार न करता राष्ट्रहितासाठीचे परखड विचार त्यांनी कायम मांडले.
व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वर्ल्ड थिंक टँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे ते महत्त्वाचे घटक होते. ‘पुणे लोकमत’च्या वास्तू लोकार्पण सोहळ्यात त्यांनी विशेष अतिथी या नात्याने व्यासपीठ भूषविले होते. तेव्हा त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही माझ्या स्मरणात आहेत. अतिशय बहुमोल, चिंतनीय आणि दिशादर्शक वैचारिक भूमिका अत्यंत खुलेपणाने थेट शब्दांत त्यांनी मांडली होती.
जमनालालजी बजाज, कमलनयनजी बजाज आणि राहुल बजाज या तीनही पिढ्यांचे दर्डा परिवाराशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते. राहुल बजाज यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांची मुले राजीव, संजीव आणि सुनयना यांच्यासह सर्व परिवाराला मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या निधनाने लोकमत परिवाराने एक ज्येष्ठ आप्त आणि सच्चा हितचिंतक गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!