अरुणाचलमध्ये फुलले ‘कमळ’
By admin | Published: January 1, 2017 01:41 AM2017-01-01T01:41:34+5:302017-01-01T01:41:34+5:30
मुख्यंमत्री पेमा खंडू यांच्यासह सत्ताधारी ‘पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल’ (पीपीए) या पक्षाचे ४३ पैकी ३३ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने अरुणाचल
इटानगर : मुख्यंमत्री पेमा खंडू यांच्यासह सत्ताधारी ‘पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल’ (पीपीए) या पक्षाचे ४३ पैकी ३३ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने अरुणाचल प्रदेशात शनिवारी निवडणुकीविना सत्तांतर झाले. अशा प्रकारे पक्षांतराच्या माध्यमातून का होईना भाजपाला ईशान्येकडील राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे स्वत:चे सरकार आणण्यात यश आले.
अरुणाचलमधील वर्षभराची राजकीय अस्थिरता गेल्या दोन दिवसांत शिगेला पोहोचली. सत्ताधारी ‘पीपीए’ पक्षाने पक्षविरोधी कारवायांचा आरोप करून मुख्यमंत्री खंडू यांच्यासह १४ आमदारांना पक्षातून निलंबित केले आणि उघडपणे पक्ष सोडण्याचे निमित्त शोधणाऱ्यांना नामी संधी मिळाली.
मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह ३३ आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे औपचारिक पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले व ‘पीपीए’मधील संघर्षाला पूर्णविराम मिळाला.
मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षही भाजपावासी झाले. त्यांना भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री खंडू यांनी पत्रकार परिषद घेऊन एकगठ्ठा पक्षांतराचा निर्णय जाहीर केला. आता माझे सरकार भाजपाचे झाले आहे व आमच्याकडे ६० पैकी ४७ असे दणकट बहुमत आहे, असे त्यांनी सांगितले.
खंडू म्हणाले की, आम्ही एरवीही भाजपाच्या वाटेवर होतोच. ‘पीपीए’ नेतृत्वाच्या बेकायदा निलंबन कारवाईने त्यास गती मिळाली, एवढेच. ‘पीपीए’च्या अध्यक्षांवर त्यांनी हुकुमशाही व एकाधिकारशाहीने वागण्याचा आरोप केला.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनीही टिष्ट्वट करून अरुणाचलमधील सत्तांतराची व तेथे भाजपाचे सरकार आल्याची ‘आनंदाची’ बातमी दिली. (वृत्तसंस्था)
पीपीपीचे शिल्लक दहा आमदार विरोधी बाकांवर
६० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे स्वत:चे १२ आमदार आहेत. त्यात खंडूंसह ३३ नवे आमदार मिळाल्याने भाजपाचे संख्याबळ ४५वर पोहोचले.
याखेरीज दोन अपक्षही सोबत असल्याने खंडू यांच्या ‘भगव्या’ सरकारला एकूण ४७ आमदारांचा पाठिंबा असेल. काँग्रेसचे तीनपैकी दोन आमदारही भाजपाच्या वाटेवर आहेत.
त्यांनीही पक्षांतर केले की विधानसभेत ‘पीपीए’चे शिल्लक राहिलेले १० व एक अपक्ष एवढे अकराच सदस्य विरोधी बाकांवर असतील.