Loudspeaker in UP: CM योगींच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशात 1 लाख भोंगे खाली उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:15 AM2022-05-04T10:15:57+5:302022-05-04T10:16:02+5:30
Loudspeaker in UP: एकीकडे महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण पेटलं असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात कुठल्याही वादाशिवाय भोंगे उतरवण्यात आले आहेत.
Loudspeaker in Uttar Pradesh : एकीकडे महाराष्ट्रात मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन गदारोळ सुरू आहे. लाऊडस्पीकर उतरवण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात कुठल्याही गोंधळाशिवाय लाऊडस्पीकर खाली उतरवले जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, आतापर्यंत राज्यात सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर बंद करण्यात आले आहेत.
मुस्लिमांचा विरोध नाही
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आमच्या सरकारने हा मुद्दा चांगल्याप्रकारे हाताळला आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरुन सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर काढण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर हटवल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाजही कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही. यूपी पोलिस सातत्याने लाऊडस्पीकरविरोधात मोहीम राबवत आहेत.
रस्त्यावरील नमाजही बंद
सीएम योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका मुद्द्यावरुन स्वतःच्या सरकारची पाठ थोपटली. ते म्हणाले की, आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाजाचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या होत्या. आता रस्त्यावर कोणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरीदेखील ईदसारख्या मुहूर्तावर कुठेही रस्त्यावर नमाज अदा केल्याचे वृत्त नाही. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज अदा करून आदेशाचे पालन करत आहेत.