"झारखंडमध्ये सुरू झाले लव्ह जिहाद"; साप्ताहिक सुट्टी बदलल्याने पंतप्रधान मोदींची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:41 PM2024-05-29T12:41:39+5:302024-05-29T12:42:57+5:30
मी आता ‘शिवीगाळ प्रूफ’ झालो आहे, असेही मोदी म्हणाले
दुमका: ‘लव्ह जिहाद’ची सुरुवात झारखंडपासून झाली, राज्यातील एका जिल्ह्यात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली रविवारची साप्ताहिक सुट्टी बदलून शुक्रवारी करण्यात आली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत मंगळवारी केला.
‘लव्ह जिहाद’ हा शब्द झारखंडमधून आला आहे, असे मला एक मित्र सांगत होता. झारखंडच्या लोकांनी ही संज्ञा तयार केली आहे,” असे सांगत मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चावर (झामुमो) जातीयवादी आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. “ब्रिटिश काळापासून रविवारची सुट्टी असूनही, झारखंडच्या एका जिल्ह्यात ती शुक्रवारी करण्यात आली. रविवार हा हिंदूंशी संबंधित नसून ख्रिश्चन समाजाशी जोडलेला आहे. २००-३०० वर्षांपासून ही सुट्टी आहे. आधी ते हिंदूंशी लढले, आता ते ख्रिश्चनांशी लढत आहेत. काय चाललंय?” असा सवाल मोदींनी केला. झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्याच्या साधनसंपत्तीची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी करणार ध्यानधारणा
पंतप्रधान मोदी ३० मे रोजी प्रचाराच्या समाप्तीनंतर कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या ‘रॉक मेमोरियल’ येथे ध्यानधारणा करतील. ३० मेच्या संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान मंडपम येथे ते ध्यान करतील. २०१९ च्या निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान केदारनाथ गुहेत अशाच प्रकारच्या ध्यानधारणेसाठी गेले होते.
मी आता ‘शिवीगाळ प्रूफ’ झालो आहे
- पराभवाने विरोधक इतके हताश झाले आहेत की शिवीगाळ करणे त्यांचा स्वभाव बनला आहे, परंतु ‘बुलेट प्रूफ’प्रमाणेच आता मीही ‘शिवीगाळ प्रूफ’ झालो आहे.
- पश्चिम बंगालमध्ये एकतर्फी निवडणूक होत आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल,” असा विश्वास मोदी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.