'प्रेमविवाह' केला म्हणून नवरीमुलीला संपूर्ण गावासमोर थुंकी चाटायला लावली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 12:13 PM2018-03-06T12:13:31+5:302018-03-06T12:13:31+5:30
लग्न कोणाबरोबर करायचे, कसे करायचे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय. पण आजही देशाच्या काही ग्रामीण भागांमध्ये प्रेमविवाह गुन्हा समजला जातो.
पाटणा - लग्न कोणाबरोबर करायचे, कसे करायचे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय. पण आजही देशाच्या काही ग्रामीण भागांमध्ये प्रेमविवाह गुन्हा समजला जातो. त्यासाठी गावातले ज्येष्ठच न्यायाधीश बनून शिक्षेचे आदेश काढतात. बिहारच्या सूपॉल जिल्ह्यातील बाराहारा गावात असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाराहारा गावातील गावकऱ्यांनी प्रेमविवाह केला म्हणून एका जोडप्याला अघोरी शिक्षा सुनावली.
गावकऱ्यांनी नवरदेवाला उठाबशा काढायला लावल्या तर नवरी मुलीला संपूर्ण गावासमोर स्वत:ची थुंकी चाटायला लावली. त्यांच्या प्रेमाला कुटुंबियांची संमती नव्हती. त्यामुळे 16 फेब्रुवारीला दोघे घरातून पळून गेले व मंदिरात विवाह केला. हे नवविवाहित जोडपे जेव्हा त्यांच्या गावी परतले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी दोघांचा स्वीकार केला. पण त्यांच्या या लग्नाला गावातल्या काही लोकांचा विरोध होता.
त्यांनी या प्रकरणी बैठक बोलवली. मुलगा आणि मुलगी दोघांच्या आई-वडिलांची लग्नाला संमती असतानाही काही गावकऱ्यांनी दोघांना अशी अघोरी शिक्षा सुनावली. या प्रकरणी मुलीच्या आजीने 11 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे अशी माहिती सूपॉलचे एसपी कुमार चौधरी यांनी दिली. गावात हा प्रकार 1 मार्च रोजी घडला.