राँग नंबरमुळे प्रेम झाले...
By admin | Published: March 1, 2017 04:34 AM2017-03-01T04:34:46+5:302017-03-01T04:34:46+5:30
तुम्हालाही अनेकदा राँग नंबरवरून कॉल्स येत असतील
तुम्हालाही अनेकदा राँग नंबरवरून कॉल्स येत असतील; परंतु अशा कॉलनंतर दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुटल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? सोफयां लोहो डानडेल या तरुणासोबत मात्र असे घडले; मात्र वस्तुस्थिती समोर आल्यानंतर तो थक्क झाला.
एक दिवस सोफयांच्या फोनवर राँग नंबरवरून कॉल आला. हा कॉल महिलेचा होता. तिच्या मधुर आवाजाने त्याला मोहित केले. या कॉलमुळे आपले पुढचे जीवन बदलून जाईल हे त्याला कुठे ठाऊक होते. तो फोनवरून ज्या महिलेशी बोलत होता तिचे नाव मार्था पोटू होते. पहिल्या कॉलनंतर तो नंतर तिच्याशी नेहमी बोलू लागला. हळूहळू त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. अनेक दिवस त्यांच्यात पे्रमालाप होत राहिला. दोघांमधील प्रेम एवढे वाढले की, एक दिवस मार्थाला भेटण्यासाठी सोफयां तिच्या घरी पोहोचला; मात्र मार्थाला पाहताच त्याच्या पायाखालची जमीन घसरली. सोफयां याने दारावरची बेल वाजविल्यानंतर ८२ वर्षांच्या महिलेने दरवाजा उघडला. दरवाजा उघडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द मार्था होती. मार्थाची हकीकत कळल्यानंतर सोफयांला दु:ख झाले; परंतु त्याचे प्रेम अस्सल होते. मार्थापूर्वी आपण कोणालाही डेट केले नव्हते, असे त्याने सांगितले. मार्थाच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. मार्थाला दोन मुले असून ते नोकरीनिमित्त बाहेरच्या देशांत राहतात. मार्था एकटी राहत होती. सोफयांने मार्थाला लग्नाची मागणी घातली आणि दोघे विवाहबद्ध झाले. मार्थाच्या कुटुंबियांनी या विवाहाला विरोध केला होता; मात्र नंतर त्यांनी या नात्याचा स्वीकार केला.