Love, Sex मुळे दहशतवादी फसतायत सुरक्षापथकांच्या जाळयात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 01:01 PM2017-08-02T13:01:53+5:302017-08-02T13:16:32+5:30
काश्मीर खो-यातील लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक दहशतवादी अबू दुजानाला काल सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. पत्नीला भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे दुजाना सुरक्षापथकांच्या जाळयात फसला.
श्रीनगर, दि. 2 - काश्मीर खो-यातील लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक दहशतवादी अबू दुजानाला काल सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. पत्नीला भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे दुजाना सुरक्षापथकांच्या जाळयात फसला. काश्मीर खो-यात सक्रीय असलेले अनेक परदेशी दहशतवाद्यांचे काश्मिरी तरुणींबरोबर प्रेमसंबंध आहेत. त्यामुळेच त्यांचा माग काढणे सुरक्षापथकांना शक्य झाले आहे. एरवी या दहशतवाद्यांचा माग काढणे कठीण असते पण प्रेयसी, पत्नीला भेटण्याची इच्छा, लैंगिकसंबंधांची आतुरता यामुळे हे दहशतवादी सहज सापळयात अडकत चालले आहेत.
पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातून येणा-या लष्कर-ए-तोयबाच्या बहुतांश दहशतवाद्यांची घरची परिस्थिती हलाखीची असते. काश्मीरमध्ये आल्यानंतर हे दहशतवादी एकतर काश्मिरी तरुणींना आपल्या प्रेमात पाडतात किंवा बंदुकीच्या धाकावर त्या तरुणींना संबंध स्विकारायला भाग पाडतात असे जम्मू-काश्मीर पोलीस दलातील अधिका-याने सांगितले.
प्रेम किंवा शरीरसंबंधांच्या ओढीने जेव्हा हे दहशतवादी वारंवार एखाद्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांचा माग काढणे गुप्तचर यंत्रणांना सोपे जाते. प्रेम, शरीरसंबंधांची चटक लागल्यानंतर या दहशतवाद्यांचा प्रेयसी किंवा पत्नीला भेटायला जाण्याचा एक ठराविक पॅटर्न बनतो. लष्कर-ए-तोएबाचा अनेक दहशतवादी त्यांच्या या वागण्यामुळे सुरक्षापथकांच्या रडारवर आले आहेत.
काहीवेळा दहशतवाद्यांकडून फसवणूक झालेल्या महिला स्वत:चा सुरक्षापथकांना त्यांची टीप देतात. अशाच प्रेम प्रकरणामुळे लष्करचा कमांडर अबू तलहा 1999 साली सुरक्षापथकांच्या जाळयात फसला होता. तलहाचे ज्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. तिच्या वडिलांनीच तलहाची गुप्तचर यंत्रणांना टीप दिली होती.
काश्मीर खो-यातून अटक करण्यात आलेला ‘लष्कर-ए-तैयबा’चा दहशतवादी संदीप शर्मा ऊर्फ आदिलने दहशतवादासाठी नव्हे तर, प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे तपासातून समोर आले. संदीप काश्मीरमध्ये एका युवतीच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबत लग्न करता यावे यासाठी त्याने धर्मपरिवर्तन करुन इस्लाम धर्म स्वीकारला. संदीप ज्या कंत्राटदाराकडे नोकरी करायचा त्याला तपासयंत्रणांनी ताब्यात घेतले असून, याच कंत्राटदाराने संदीपला नोकरीसाठी काश्मीरला पाठवले होते. संदीप वेल्डींगचे काम करायचा. त्याने संदीपसह आणखी दोघांना त्याच कामासाठी काश्मीरला पाठवले होते.