...अन् तब्बल 40 वर्षांनी वृद्ध दाम्पत्याने घेतल्या सप्तपदी; जावयाने 60 व्या वर्षी लावलं सासू-सासऱ्यांचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:24 PM2022-01-20T17:24:31+5:302022-01-20T17:32:11+5:30
लेक आणि जावयाने पुढाकार घेऊन 60 व्या वर्षी वृद्ध दाम्पत्याचं थाटामाटात लग्न लावून दिलं आहे.
नवी दिल्ली - राजस्थानच्या बासवाडामध्ये एक अनोखा विवाहसोहळ संपन्न झाला आहे. एका दाम्पत्याने 40 वर्षांनंतर सप्तपदी घेतल्या आणि एकमेकांना हार घातला आहे. सर्व विधींसह 60 वर्षांच्या नवरा-नवरीने लग्न केलं. विशेष म्हणजे लेक आणि जावयाने पुढाकार घेऊन 60 व्या वर्षी वृद्ध दाम्पत्याचं थाटामाटात लग्न लावून दिलं आहे. 40 वर्षांपूर्वी या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण त्यावेळी प्रेमविवाहाला समाजाचा विरोध असल्याने या दोघांचं हिंदू पद्धतीनुसार लग्न झालं नव्हतं. मात्र त्यांचा जावई आणि मुलीची इच्छा होती की, वृद्ध दाम्पत्यांनी थाटामाटात सर्व विधींसह विवाह करावा. म्हणून आता लग्न करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षांपूर्वी रूपगडचे वडलीपाडा निवासी बाबू (60) यांना तलाईपाडा निवासी कांता (60) हिच्यावर प्रेम जडलं होतं. दोघं एकमेकांना पसंत होते. त्यावेळी प्रेम विवाह समाजात स्विकारला जात नव्हता. दोघांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला जोरदार विरोध केला होता. मात्र तरी या दोघांनी प्रेमविवाह केला आणि ते एकत्र राहू लागले. त्यांना एक मुलगी देखील झाली. आपल्या लग्नाला समाज मान्यता मिळाली नसल्याने त्यांना ते दु:ख होतं. हिच गोष्ट मुलगी आणि जावयाच्या लक्षात आली.
जावय आणि मुलीने या दाम्पत्याचं विधीवत लग्न करण्याचं ठरवलं. त्यानुसार जय्यत तयारी देखील करण्यात आली. बुधवारी बाबू आणि कांताने विधीवत सप्तपदी घेतल्या. या लग्नात 100 वऱ्हाडी सामील झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबालाही बोलावलं. बाबू आणि कांता यांना एकच मुलगी आहे. सीमाचं लग्न राजूसोबत झालं असून मुलगी आणि जावयामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. सर्वत्र आता याच लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.