दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातील अनोखी लव्ह स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 01:14 PM2018-05-09T13:14:56+5:302018-05-09T13:14:56+5:30
27 वर्षांनंतर प्रथमच 'अशी' लव्ह स्टोरी पाहायला मिळाली
नवी दिल्ली: दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात 27 वर्षांनंतर रॉयल बंगाल टायगर आणि पांढऱ्या पट्ट्यांच्या वाघिणीची प्रेम कहाणी पाहायला मिळतेय. चांगल्या प्रजातीच्या वाघाचा जन्म व्हावा, यासाठी तीन वर्षांची वाघीण निर्भया आणि पाच वर्षांचा वाघ करण यांना प्राणीसंग्रहालय प्रशासनानं काही वेळासाठी एकमेकांजवळ ठेवलं होतं. यानंतर आता लवकरच निर्भया वाघीण एका बछाड्याला जन्म देण्याची शक्यता आहे.
बंगाली वाघ आणि पांढऱ्या वाघिणीला एकत्र ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या संचालिका ऋतू सिंह यांनी दिली. यानंतर काही कालावधीसाठी दोघांना एकमेकांच्या सहवासात ठेवण्यात आलं. रविवारी निर्भया आणि करण यांना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं. यावेळी या दोघांनी एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद दिला. एका वाघिणीचा गर्भावस्थेचा काळ साधारणत: 110 दिवसांचा असतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निर्भया बछड्याला जन्म देण्याची शक्यता आहे.
सोमवारी करण आणि निर्भयाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. यापुढे या दोघांना फार काळ एकत्र ठेवलं जाणार नसल्याचं प्राणीसंग्रहालय प्रशासनानं सांगितलं. याआधी 1991 मध्येही अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. यामधून एका सफेद पट्ट्यांचा वाघ आणि एका रॉयल बंगाल टायगरचा जन्म झाला होता. पांढऱ्या वाघांमध्ये प्रजननाचं प्रमाण जास्त असतं, अशी माहिती संचालिका ऋतू सिंह यांनी दिली. यामधून जन्मणारे वाघ पांढरे किंवा सोनेरी रंगांचे असतात आणि ते अतिशय आक्रमक असतात, असंही सिंह यांनी सांगितलं.