प्रेम जिंकलं...16 दिवसांची लढाई, वृद्ध पती-पत्नीच्या प्रेमापुढं कोरोना पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:09 PM2021-05-26T17:09:11+5:302021-05-26T17:10:29+5:30
श्याम प्रकाश त्रिपाठी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर कोविड वार्डमध्ये दाखल होण्यासाठी पत्नीनेही आग्रह धरला. पत्नीच्या या आग्रहापुढे आरोग्य विभागही हतबल झाल्याचं दिसून आलं.
शाहजहाँपूर - एकदा लग्नाची गाठ बांधली की सात जन्माची साथ देण्याची शपथ घेतली जाते, असे म्हणतात. लग्नानंतर सुख-दु:ख दोघांनीही वाटू घ्यायच असतं. एकमेकांना आधार द्यायचा असतो, एकमेकांच्या पाठिशी उभं राहायचं असतं. 65 वर्षीय श्याम प्रकाश त्रिपाठी आणि पत्नी मिना त्रिपाठी यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकताना आपल्या प्रेमाचा दाखलाच दिला आहे. त्यामुळेच, या दोघांचं प्रेमही कोरोनाला पराभूत करुन जिंकलंय.
श्याम प्रकाश त्रिपाठी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर कोविड वार्डमध्ये दाखल होण्यासाठी पत्नीनेही आग्रह धरला. पत्नीच्या या आग्रहापुढे आरोग्य विभागही हतबल झाल्याचं दिसून आलं. तब्बल 16 दिवस आपल्या पतीची कोविड वार्डमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांच्यासोबत राहून सेवा केली अन् पतीला कोरोनातून मुक्त केलं. विशेष म्हणजे पती श्याम प्रकाश हे ह्रदयविकाराचे रुग्ण होते. कोरोनाची लढाई जिंकलेले दोघे पती-पत्नी आज आनंदी आहेत.
उत्तर प्रदेशच्या सदर बझार क्षेत्रातील नैनीताल बँकेशेजारी राहणाऱ्या श्याम प्रकाश त्रिपाठी यांना 9 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी, 58 वर्षीय वृद्ध मिना त्रिपाठीही रुग्णालयात आल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाने त्यांना वापस जाण्यास सांगितले. मात्र, मिना त्रिपाठी यांनी नकार देत पतीसोबतच रुग्णालयात राहणार असल्याचे सांगितले. मात्र, पतीसोबत आयुष्याची 40 वर्षे घालवली आहेत, जीवन त्यांच्यासोबत जगले आहे. त्यामुळे, आता मरण जरी आलं तरी त्यांच्यासोबतच यावं, अस उत्तर मिना यांनी दिलं. मिना यांच्या उत्तराने आरोग्य विभागातील कर्मचारीही निरुत्तर झाले होते.
आरोग्य विभागाने पती-पत्नीला सोबत राहण्याची परवानगी दिली. त्यासाठी, पत्नीकडून लिखित स्वरुपात निवेदनही घेण्यात आले. त्यानुसार, आपल्या कोविड पॉझिटीव्ह पतीसोबत तब्बल 16 दिवस आयसोलेशन वार्डमध्ये राहिल्यानंतर कोरोनाला पराभूत करुन दोघे पती-पत्नी कोविड सेंटरमधून बाहेर पडले. विशेष म्हणजे मिना त्रिपाठा यांचा रिपोर्टही निगेटीव्ह आला. दरम्यान, 9 मे 1981 साली श्याम प्रकाश आणि मीना यांचं लग्न झालं होतं. तेव्हापासून मीना यांनी कायम आपल्या पतीची साथ-सोबत दिली. त्यामुळेच, कोरोनाच्या संकटातही त्यांनी पतीला एकटं न सोडता, निस्वार्थ प्रेमाचा आदर्श जगासमोर ठेवला.