पत्नी गेली आणि प्रेयसीही गेली! लव्हगुरू मटुकनाथच्या नशिबी आले एकाकीपण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 03:16 PM2018-04-23T15:16:15+5:302018-04-23T15:16:15+5:30
प्रेमासाठी काय पण म्हणत जगाचा विरोध पत्करून आपल्या विद्यार्थिनीसोबत विवाह रचणारे बिहारी प्राध्यापक मटुकनाथ दशकभरापूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. प्रेमासंदर्भातल्या त्यांच्या विचारामुळे त्यांना लव्हगुरूही म्हटले जायचे. मात्र....
पटना - प्रेमासाठी काय पण म्हणत जगाचा विरोध पत्करून आपल्या विद्यार्थिनीसोबत विवाह रचणारे बिहारी प्राध्यापक मटुकनाथ दशकभरापूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. प्रेमासंदर्भातल्या त्यांच्या विचारामुळे त्यांना लव्हगुरूही म्हटले जायचे. मात्र प्रेमासाठी पत्नीला सोडणाऱ्या 64 वर्षीय मटुकनाथ यांची प्रेयसीही त्यांना सोडून गेली आहे. त्यामुळे या लव्हगुरूंच्या नशिबी आता एकाकीपण आले आहे.
काही वर्षांपूर्वी लव्हगुरू प्राध्यापक मटुकनाथ आणि आणि त्यांची विद्यार्थिनी ज्युली कुमारी यांची लव्हस्टोरी देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर मटुकनाथ यांनी पत्नीला सोडत ज्युलीसोबत संसार थाटला होता. मात्र त्यांची ही लव्हस्टोरी आता वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यांची प्रेयसी ज्युलीने सध्या आध्यात्माच्या दिशेने पावले वळवली आहेत. त्यामुळे मटुकनाथ यांच्यावर सध्या एकाकी जीवन जगावे लागत आहे.
याबाबत विचारले असता मटुकनाथ म्हणाले, " वेळ कधी बदलेल हे कुणालाच सांगता येत नाही. माझ्यासोबतही असेच झाले आहे. आम्ही दहा वर्षे एकत्र संसार केला. मात्र अचानक ज्युलीला संसारिक जीवनापासून विरक्ती आली." मटुकनाथ आणि ज्युली यांची भेट 2004 साली झाली होती. त्यावेळी ते 51 वर्षांचे होते तर ज्युली 21 वर्षांची होती. दोन वर्षांनंतर त्यांची लव्हस्टोरी देशभरातील वृत्तपत्रे आणि टिव्ही चॅनलमधील चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर पाटणामधील बीएन कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले मटुकनाथ या प्रेमप्रकरणावरून अडचणीत सापडले होते. आरोप प्रत्यारोपांनंतर मटुकनाथ यांना विद्यापीठाने निलंबित केले होते. तसेच कॉलेजमधूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मटुकनाथ यांच्या पत्नीने चॅनेलच्या पत्रकारांसह एका घरावर धाड टाकून मटुकनाथ आणि ज्युली यांना रंगेहात पकडून दिले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळेही फासले होते.