'प्रेमी जोडपे अशी गळाभेट घेतात जणू खाऊन टाकतील, त्यांना तुरूंगात टाका'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 05:35 PM2017-09-21T17:35:17+5:302017-09-21T17:48:56+5:30
मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डन प्रेमी जोडपे सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपे एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरूणी किंवा तरूण एकमेकांना खाऊन टाकतील
भरतपूर(राजस्थान), दि. 21 - सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. सार्वजनिकपणे प्रेमाचं प्रदर्शन करणा-या प्रेमी जोडप्यांना तुरूंगात टाकावं असं विधान त्यांनी केलं आहे.
मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डन प्रेमी जोडपे सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपे एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरूणी किंवा तरूण एकमेकांना खाऊन टाकतील असं उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथून लोकसभेचे खासदार असलेले साक्षी महाराज म्हणाले.
राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना साक्षी महाराज म्हणाले, काही चुकीचं घडण्याआधी अशा जोडप्यांवर कारवाई करून त्यांना तुरूंगात टाकायला पाहिजे असं ते म्हणाले. प्रेमी जोडप्यांच्या अशा कृत्यांकडे सर्वजण दुर्लक्ष करतात पण बलात्कार झाल्यावर पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली जाते.
यापूर्वी साक्षी महाराजांनी बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगचा बचाव केला होता.
काय म्हणाले होते राम रहीमच्या बचावात-
बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर डेरा प्रमुखाची पाठराखण करण्यासाठी भाजपचे खासदार साक्षी महाराज पुढे सरसावले होते. हे प्रकरण म्हणजे भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे असे साक्षी महाराज यांनी म्हटले. 'कुण्या एकाच व्यक्तीने बाबा राम रहीम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय, मात्र करोडो लोक त्यांना देव मानत आहेत', अशा शब्दात साक्षी महाराज यांनी दोषी ठरविण्यात आलेल्या बाबा राम रहीमचा बचाव केला.
राम रहीमचा बचाव करताना भाजप खासदार साक्षी महाराज पुढे म्हणाले की, कोर्ट करोडो भक्त काय म्हणतात ते ऐकत नाही, केवळ एका तक्रारदाराचे म्हणणे मात्र एकते. मग एक तक्रारदार बरोबर आहे की, करोडो भक्त?. कोर्टाने साधा माणूस असलेल्या राम रहीमला बोलावले, याचा अर्थ झालेल्या नुकसानीला कोर्टही जबाबदार आहे.
भाजपचे आणखी एक नेता आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही नाव न घेता बाबा राम रहीमचा बचाव केला होता. स्वामींनी ट्विटद्वारे , 'साधूंसाठी नवी धमकी: राजनेता आणि आश्रमांमध्ये राहणारे साधू स्वामीजींना तुरूंगात पाठवून आश्रमातील संपतीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. साधूंनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांना ताकद दिली पाहिजे.'असं म्हटलं होतं.