कमी अंतराच्या रेल्वेंमध्ये स्लीपरऐवजी ‘चेअर कार’
By admin | Published: November 21, 2014 03:10 AM2014-11-21T03:10:01+5:302014-11-21T03:10:01+5:30
कमी पल्ल्याच्या रेल्वेंमध्ये प्रवाशांची क्षमता वाढविण्यासाठी स्लीपरऐवजी ‘चेअर कार’चा वापर करण्याची, तसेच रात्रीचा प्रवास बससारखा करण्याची कल्पना नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी समोर आणली आहे.
नवी दिल्ली : कमी पल्ल्याच्या रेल्वेंमध्ये प्रवाशांची क्षमता वाढविण्यासाठी स्लीपरऐवजी ‘चेअर कार’चा वापर करण्याची, तसेच रात्रीचा प्रवास बससारखा करण्याची कल्पना नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी समोर आणली आहे.
गर्दी असलेल्या रेल्वेमधील एसी स्लीपर कोच हटवून त्याऐवजी चेअर कारचा वापर केल्यास किमान दहा तासांचा रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची क्षमता वाढवता येऊ शकते.
कमी अंतरासाठी डबल डेकर गाड्यांची संख्या वाढविण्याचीही प्रभू यांची योजना आहे. रेल्वे मंडळ सध्या ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यावर विचार करीत आहे. विभागीय रेल्वेमंडळांना त्यासंबंधी डाटा गोळा करण्याचा आदेश देण्यात आला असून मंडळ आणि रेल्वेमंत्री त्याबाबत औपचारिक निर्णय घेतील.
रात्रभराचा प्रवास किंवा दहा तासांपेक्षा कमी काळाचा प्रवास असल्यास स्लीपर कारऐवजी चेअर कारचा वापर करता येऊ शकतो. प्रवासी रेल्वेंना मालगाड्यांच्या तुलनेत अधिक म्हणजे प्रत्येक कि. मी. मागे दुप्पट ऊर्जेचा वापर करावा लागतो. अशा गाड्यांचा वेगही जास्त
असतो.
रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता प्रवासी वाहतुकीकडून केवळ २८.५ टक्के मिळकत आहे; पण त्यासाठी ४४ टक्क्यांपेक्षा जास्त ऊर्जेचा वापर होतो. त्यामुळेच चेअर कार आणि डबल डेकरचा विचार समोर आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)