लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला !
By admin | Published: August 3, 2016 05:12 AM2016-08-03T05:12:04+5:302016-08-03T05:12:04+5:30
राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत.
मीना-कमल,
लखनौ- राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत. बॉम्बेचे मुंबई करणे असो, संसदेत गायले जाणारे वंदे मातरम्, खासदार निधी सुरू करणे असो की विदेशी बेबी मिल्कच्या पॅकवर ‘आईचेच दूध मुलांसाठी सर्वश्रेष्ठ असते’ हे वाक्य लिहिणे अनिवार्य करण्यासारख्या उपाययोजना असोत. त्याचे श्रेय या ८२ वर्षीय अनुभवी नेत्यालाच दिले जाते. कधी सरकारने पारित केलेली विधेयके परत पाठविल्याच्या वादामुळे तर कधी आपल्या कामकाजामुळे नाईक हे उत्तर प्रदेशात कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर राजभवनात संघांचा अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोपही झाला, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी संयम राखत कोणत्याही दबावाखाली न येता आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्या धडाडीने पार पाडल्या. नाईक यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही खासगीत प्रशंसा करतात. नाईक यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अनुभवाचा पट उलगडला.
प्रश्न : उत्तर प्रदेशबाबत तुमचा अनुभव कसा राहिला?
उत्तर : आयुष्याच्या ८२ वर्षे उलटली. उत्तर प्रदेशातील दोन वर्षे कशी गेली माहीत नाही. काम करीत राहिलो. १९७८ मध्ये पहिल्यांदा आमदार बनलो. त्यानंतर पाचवेळा खासदार आणि मंत्री राहिलो. पदावर असो किंवा नसो; मात्र गेल्या ३७ वर्षांमध्ये जनहिताचे कार्य करीत राहिलो. जे काम केले त्याचा वर्षभराचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवत असतो. लोकांनी खूप प्रेम दिले.
प्रश्न : उत्तर प्रदेशला पुढे नेण्यासाठी काय करायला हवे?
उत्तर : मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. येथील लोक तेथे जाऊन खूप मेहनत करून समोर जात आहेत. कुणी केळी विकतो. कुणी मासे विकतो, तर कुणी बिल्डर आहेत. नोकरीसाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. येथे रोजगार मिळाला तर तसे होणार नाही. येथे राहूनच तेवढे कष्ट घेतले तर निश्चितच राज्य पुढे जाईल.
प्रश्न : राजभवन आणि सरकारमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला. विधेयकांना मंजुरी वगैरे?
उत्तर : सरकारसोबत माझा कधीही संघर्ष नव्हता मुख्यमंत्री अखिलेश यादव चांगले व्यक्ती आहेत. राज्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचा विचार त्यांच्याकडे आहे. सरकार आणि माझे संबंध चांगले आहेत. विधेयकांची बाब पाहता संवैधानिक व्यवस्थेचे पूर्णपणे पालन करणे हे राज्यपालांचे उत्तरदायित्व ठरते. याच दायित्वाचे मी पालन केले.
प्रश्न: तुम्ही उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेबाबत?
उत्तर : कायदा व सुव्यवस्था ठीक नसण्याची अनेक कारणे आहेत. कायदा व व्यवस्था वाईट आहे असे मी म्हणणार नाही,पण सध्या परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.
प्रश्न: आजपर्यंतच्या कार्यकाळात कोणती बाब खूप वाईट आणि मनाला त्रासदायक वाटली?
उत्तर : एमबी क्लब येथील लष्कराच्या कार्यक्रमात धार्मिक वेशामुळे मुस्लिम धर्मगुरूला प्रवेश न दिला जाणे हे खूप वाईट वाटले. ड्रेस कोडचे पालन न केल्याने प्रवेश दिला गेला नाही. त्यावर मी नियम बदलण्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे.
प्रश्न: दयाशंकर सिंग आणि बसपामधील अपशब्दांचा वाद हे ताजे उदाहरण आहे. त्यावर नियंत्रणासाठी कोणता सल्ला द्याल?
उत्तर : संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे.
>सक्रिय राजकारणात
पुन्हा येणार काय?
मला पाच वर्षे राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली आहे. दोन वर्षे संपली आहेत.
आणखी तीन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर विचार करेन. पुढे काय करायचे हे ठरवताना समाजाला काही देण्याचा विचार राहील.
संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे. राजकारणाचा स्तरही घसरत आहे. भाषेवर संयम ठेवावा असा माझा सल्ला आहे.