प्रचाराने गाठली खालची पातळी, यूपीत वातावरण गढूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:59 AM2019-03-29T01:59:42+5:302019-03-29T01:59:59+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील इतर भागांप्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही रणधुमाळी सुरू असली तरी या राज्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते परस्परांवर हीन दर्जाचे वैैयक्तिक आरोप करीत असून प्रचाराची पातळी अत्यंत खालावली आहे.
लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील इतर भागांप्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही रणधुमाळी सुरू असली तरी या राज्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते परस्परांवर हीन दर्जाचे वैैयक्तिक आरोप करीत असून प्रचाराची पातळी अत्यंत खालावली आहे.
भाजपाचे बैरिया येथील आमदार सुरेंद्र सिंह यांनी मायावतींवर केलेली टीका असो किंवा उत्तर प्रदेशचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी राहुल गांधींबद्दल केलेले असभ्य वक्तव्य यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले की, ६० वर्षे वयाच्या असूनही मायावती फेशियल करतात व आपले केस रंगवतात. त्याच्याही पुढे जाऊन या आमदार महाशयांनी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी व हरयाणाच्या गायिका-नृत्यांगना सपना चौधरी यांची तुलना करीत त्यांच्यावर गलिच्छ टीका केली. सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सपना चौधरी यांना आपलेसे करावे.
सुरेंद्र सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे याआधी वादळे उठली आहेत. राहुल गांधी व त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा म्हणजे रावण व शूर्पणखा आहेत. आपला एके काळचा शत्रू समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करून मायावतींनी महिलांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, अशीही विधाने सुरेंद्र सिंह यांनी केली होती. समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी नेत्यानेही प्रियांका गांधी यांच्याविरोधात पोस्टर्स लावली असून, ती काँग्रेसच्या टिळक भवन या कार्यालयाबाहेर लावली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)