देशात बेरोजगारीचा नीचांक, दर ३.१ टक्क्यांवर; ‘एनएसएसओ’चा अहवाल; तीन वर्षांत सर्वांत कमी प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 08:09 AM2024-03-06T08:09:24+5:302024-03-06T08:09:51+5:30
महिलांमधील बेरोजगारीचा दर २०२३ मध्ये घटून ३ टक्के झाला. २०२२ मध्ये तो ३.३ टक्के आणि २०२१ मध्ये ३.४ टक्के होता.
नवी दिल्ली : वर्ष २०२३ मध्ये १५ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमधील बेरोजगारीचा दर घटून ३.१ टक्के झाला. हा बेरोजगारीचा ३ वर्षांतील नीचांक ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे, महिला आणि शहरांतील बेराेजगारी घटल्याचे आढळले आहे.
‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटने’ने (एनएसएसओ) मंगळवारी जारी केलेल्या ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण’ अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ३.१ टक्के राहिला. २०२२ मध्ये तो ३.६ टक्के आणि २०२१ मध्ये ४.२ टक्के होता.
मार्च २०२० मध्ये देशात कोविड साथ सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला होता. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाली.
महिलांच्या बेरोजगारीत घट
- महिलांमधील बेरोजगारीचा दर २०२३ मध्ये घटून ३ टक्के झाला. २०२२ मध्ये तो ३.३ टक्के आणि २०२१ मध्ये ३.४ टक्के होता.
- पुरुषांतील बेरोजगारीचा दर २०२२ मध्ये ३.७ टक्के आणि २०२१ मध्ये ४.५ टक्के होता. तो गेल्यावर्षी घटून ३.२ टक्के झाला.
शहरांतील बेरोजगारी घटली
- ५.२ टक्के एवढा शहरी भागांतील बेरोजगारीचा दर २०२३ मध्ये घटूनझाला. २०२२ मध्ये तो ५.७ टक्के आणि २०२१ मध्ये ६.५ टक्के होता.
- २.४ टक्के ग्रामीण भागातील बेरोजगारी २०२३ मध्ये राहिला. तो २०२२ मध्ये २.८ टक्के आणि २०२१ मध्ये ३.३ टक्के होता.