शाळेत नर्सरी, केजीप्रमाणे लोअर केजीचाही वर्ग; सीबीएसईकडून होणार अंमलबजावणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:01 AM2023-03-28T09:01:38+5:302023-03-28T09:01:56+5:30
शाळांना पायाभूत स्तरावरील पाच वर्षे कालावधीच्या शिक्षणामध्ये तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ठेवावी लागतील.
नवी दिल्ली : पूर्व प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याकरिता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याची (एनसीएफ-एफएस)ची सीबीएसई शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी या शाळांना पायाभूत स्तरावरील पाच वर्षे कालावधीच्या शिक्षणामध्ये तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ठेवावी लागतील. त्यामुळे नर्सरी, केजीबरोबरच लोअर केजी या वर्गाचीही भर पडेल.
सरकारी व केंद्रीय शाळांनी अशा हालचाली सुरू केल्या असून, या शाळांमध्ये नजीकच्या काळात पूर्व प्राथमिकचे तीन वर्ग असतील, असे सीबीएसईच्या सूत्रांनी सांगितले. एनसीएफ-एफएस २०२२मध्ये दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी शाळांनी पायाभूत स्तरावरील पाच वर्षे कालावधीचा शिक्षण आराखडा लागू करावा असे आदेश सीबीएसईने आपल्याशी संलग्न शाळांना दिले आहेत. (वृत्तसंस्था)
बालवाटिका, जादुई पिटारा...
पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या कालावधीला ‘बालवाटिका’ असे नाव देण्यात आले आहे. या कालावधीतील वर्गांमध्ये बालकांना खेळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर दिला जाईल. नर्सरीमध्ये मुलांना शिकविण्यासाठी ‘जादुई पिटारा’ या नावाने शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला आहे. मुलांनी हसतखेळत शिक्षण घ्यावे, असा उद्देश आहे.
नवी पाठ्यपुस्तके
पहिली व दुसऱ्या इयत्तेसाठी एनसीईआरटीने नवी पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. पूर्व प्राथमिक शिक्षणात तीन ते ६ वर्षे वयाच्या बालकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. त्यामुळे शैक्षणिक पाया अधिक मजबूत होईल, असे सीबीएसईच्या सूत्रांनी सांगितले.