मोठ्ठा दिलासा: तब्बल १९८ रुपयांनी स्वस्त झाला कमर्शियल एलपीजी सिलेंडर, तुमच्या शहरात किती दर, जाणून घ्या
By नितीन जगताप | Published: July 1, 2022 12:35 PM2022-07-01T12:35:40+5:302022-07-01T12:36:25+5:30
LPG Commercial Cylinder Price: आज १ जुलै रोजी महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे.
नवी दिल्ली - आज १ जुलै रोजी महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. दिल्लीमध्ये मुंबईत आता हा सिलेंडर १९८१ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत या सिलेंडरच्या दरात आधीपेक्षा १९० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने देशातील चार महानगरांमध्ये कमर्शियल सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. यामध्ये सर्वाधिक कपात ही दिल्लीत करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये सर्वात कमी कपात झाली आहे. मात्र घरगुती ग्राहकांना कंपनीने कुठलाही दिलासा दिलेला नाही. घरगुती ग्राहकांना आधीच्या दरांप्रमाणेच गॅस सिलेंडर मिळत राहील.
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये इंडेनचा गॅस सिलेंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर कोलकातामध्ये याची किंमत ही १८२ रुपयांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये १९ किलोग्रॅम किंमत असलेला एलपीजी सिलेंडर १९०.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर चेन्नईमध्ये याची किंमत १८७ रुपयांनी घटली आहे.
कपातीनंतर चार शहरांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्येही बदल झाले आहेत. त्यानुसार दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅम वजनाच्या किंमत आता २०२१ रुपये असेल. तर मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडरची किंमत सर्वात कमी असेल. मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडर १९८१ रुपयांना मिळेल. तर चेन्नईमध्ये सर्वात महाग म्हणजे २१८६ रुपयांनी कमर्शियल सिलेंडर मिळेल.
घरगुती ग्राहकांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरची किंमत सध्या १००३ रुपये आहे. तर मुंबईमध्येही तो याच दराने मिळत आहे. कोलकातामध्ये घरगुती सिलेंडर सर्वात महाग म्हणजे १०२९ रुपयांना मिळेल. त्यानंतर चेन्नईमध्ये याची किंमत १०१९ रुपये आहे.