एप्रिल फूल नव्हे, एप्रिल फायर! सर्वसामान्यांना महागाईचा झटका; सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:41 AM2022-04-01T08:41:56+5:302022-04-01T08:42:15+5:30
एलपीजी सिलिंडरच्या दरात एकाच झटक्यात मोठी वाढ; सर्वसामान्य जनता 'गॅस'वर
नवी दिल्ली: आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा जबरदस्त झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे. १९ किलोचा व्यवसायिक वापरासाठीचा सिलिंडर महागला. मुंबईत सिलिंडरचा दर २२०५ रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल, डिझेल पाठोपाठ सिलिंडरचे दर वाढल्यानं सर्वसामान्य ग्राहक गॅसवर आहे.
व्यवसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलचं जेवण महागणार आहे. घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. १० दिवसांपूर्वीच घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत आजपासून १९ किलोचा सिलिंडर २२०५ रुपयांना मिळेल. कालपर्यंत हाच सिलिंडर १९५५ रुपयांना मिळायचा.
मुंबईसोबत सर्वच महानगरांमध्ये सिलिंडरचे दर वाढले आहेत. दिल्लीत सिलिंडरचा दर २२०३ रुपयांवरून २२५३ रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात सिलिंडरचा दर २०८७ रुपयांवरून २३५१ झाला आहे. चेन्नईत सिलिंडरसाठी २४०६ रुपये मोजावे लागतील. आधी इथे सिलिंडरचा दर २१३८ रुपये होती. गेल्या दोन महिन्यांत सिलिंडरच्या दरात ३४६ रुपयांची वाढ झाली आहे. १ मार्चला सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची वाढ झाली. २२ मार्चला सिलिंडर ९ रुपयांनी स्वस्त झाला होता.