LPG Cylinder Price: मे महिन्याच्या सुरवातीलाच खूशखबर, गॅस सिलिंडरच्या दरात झाली मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:27 AM2023-05-01T10:27:46+5:302023-05-01T10:29:00+5:30
LPG Cylinder Price: गेल्या काही काळापासून महागाई प्रचंड वाढली असताना मे महिन्याच्या सुरवातीलाच एक दिलासादायक बातमी आली आहे.
गेल्या काही काळापासून महागाई प्रचंड वाढली असताना मे महिन्याच्या सुरवातीलाच एक दिलासादायक बातमी आली आहे. देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. देशातील चार मोठ्या महानगरांमध्ये सिलिंडरच्या दरात १७१.५० रुपये एवढी कपात करण्यात आली आहे. ही कपात आजपासून म्हणजेच १ मेपासून लागू झाली आहे.
तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नव्या दरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता १९ किलोचा सिलेंडर २०२८ रुपयांऐवजी १८५६.५० रुपयांना मिळेल. तर कोलकातामध्ये २१३२ रुपयांऐवजी १९६०.५० रुपयांना आणि मुंबईत १९८० रुपयांऐवजी १८०८.५० रुपयांना व्यावसायिक एलपीजी सिलेंडर मिळेल. तर चेन्नईत हा सिलेंडर २०२१ रुपयांना मिळेल.
याआधी १ एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी ९२ रुपयांनी स्वस्त झाला होता. तर मार्चमध्ये या दरात ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आज कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ११०३, मुंबईत १११२.५, कोलकातामध्ये ११२९ आणि चेन्नईत १११८.५० रुपयांना मिळत आहे.