LPG Cylinder Price: बजेटआधी खूषखबर! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी घसरण; पाहा नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 11:01 AM2022-02-01T11:01:12+5:302022-02-01T11:01:31+5:30
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; बजेटआधी मोठा दिलासा
मुंबई: वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. व्यवसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ९१.५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यवसायिक गॅसच्या किमतीत कपात केली आहे. मात्र घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती जैसे थे आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही.
भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठीचे घरगुती गॅसचे दर जारी केले आहेत. त्यानुसार विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्यवसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात ९१.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात एलजीपी सिलिंडरच्या दरात १०२.५० रुपयांनी कपात झाली होती. यानंतर आता अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. मात्र १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर तेच आहेत. त्यात बदल झालेला नाही. गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या १ तारखेला जाहीर होतात.
कोणत्या शहरात किती दर?
व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत कंपन्यांनी ९१.५ रुपये कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत व्यवसायिक सिलिंडरचा दर १,९०७ रुपये झाला आहे. कोलकात्यात सिलिंडरचा दर ८९ रुपयांनी कमी झाला आहे. तिथे आता एका सिलिंडरसाठी १,९८७ रुपये मोजावे लागतील. मुंबईत एका सिलिंडरचा दर १,९४८.५ रुपये आहे. आता याच सिलिंडरसाठी १,८५७ रुपये मोजावे लागतील.