LPG Cylinder Price: आता तर सबसिडी पण गेली; घरगुती सिलिंडरचा दर गेल्या ८ वर्षात अडीच पटीनं वाढला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:09 AM2022-07-07T10:09:50+5:302022-07-07T10:10:42+5:30
रेकॉर्ड ब्रेक महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरच्या दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
नवी दिल्ली-
रेकॉर्ड ब्रेक महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरच्या दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यातच कालच पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंगडरच्या किमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ करुन जोरदार झटका दिला. घरगुती सिलिंडरच्या दरात गेल्या काही वर्षांत सातत्यानं वाढ नोंदविण्यात आली आहे. आजवरचे आकडे पाहिले तर आठ वर्षात घरगुती सिलिंडरच्या दरात जवळपास अडीच पटीनं वाढ झाली आहे.
सरकारी तेल वितरण कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) आकडेवारीनुसार मार्च २०१४ मध्ये अनुदानित (सबसिडी) सिलिंडरचा दर ४१० रुपये इतका होता. सध्याच्या वाढीव दरानुसार आता १४.२ किलो घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत सध्या LPG सिलिंडरच्या दर १०५३ रुपये इतका आहे. १४.२ किलो सिलिंडरसोबतच ५ किलो सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. ५ किलो सिलिंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ झाली आहे.
कोणत्या शहरात किती दर?
दिल्ली- १०५३
मुंबई- १०५३
कोलकाता- १०७९
चेन्नई- १०६९
लखनौ- १०९१
जयपूर- १०५७
पाटणा- ११४३
इंदौर- १०८१
अहमदाबाद- १०६०
पुणे- १०५६
गोरखपूर- १०६२
भोपाळ- १०५९
आग्रा- १०६६
वर्षभरात गॅसच्या किंमती एवढ्या वाढल्या
गेल्या वर्षभरात दिल्लीत घरगुती सिलिंडरच्या दरात जवळपास २१९ रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी दिल्लीत घरगुरीत सिलिंडरचा दर ८३४.५० रुपये इतका होता. जो आज १०५३ रुपये इतका झाला आहे. १४.२ किलो घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात याआधी १९ मे रोजी वाढ झाली होती. त्यावेळी चार रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी २२ मार्च रोजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती.