देशातील ९० टक्के घरांत एलपीजी - धर्मेंद्र प्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:52 AM2018-12-11T04:52:33+5:302018-12-11T04:52:55+5:30
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केला.
मुंबई : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केला. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांच्या कालावधीत देशभर १३ कोटी एलपीजी कनेक्शन होते, तर मोदी सरकारच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत १२ कोटी लोकांना एलपीजी कनेक्शन देण्यात आल्याचे प्रधान यांनी सांगितले.
महाराष्ट्रात विविध भागांत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने एका अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सावरकर स्मारक सभागृहातील या कार्यक्रमास भाजपा खासदार विनय सहस्रबुद्धे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित होत्या. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण ३३ लाख ८६ हजार २६८ गरीब घरांमध्ये एलपीजी जोडणी करण्यात आल्याचे प्रधान यांनी सांगितले.