LPG Gas: आता घरगुती वापरासाठी वर्षाला मिळणार केवळ एवढेच सिलेंडर, महिन्याचा कोटाही झाला निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 09:40 AM2022-09-29T09:40:47+5:302022-09-29T09:41:39+5:30
LPG Gas Cylinder: गेल्या काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी कंपन्यांनी कोटा निर्धारित केला आहे. त्यामुळे या कोट्यापेक्षा अधिक सिलेंडर मिळवणे कठीण जाणार आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी कंपन्यांनी कोटा निर्धारित केला आहे. त्यामुळे या कोट्यापेक्षा अधिक सिलेंडर मिळवणे कठीण जाणार आहे. कंपन्यांनी निश्चित केलेल्या नव्या नियमांनुसार आता एका कनेक्शनवर वर्षभरामध्ये आता केवळ १५ सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती गॅस ग्राहकांना १५ पेक्षा अधिक सिलेंडर मिळणार नाहीत. तसेच ग्राहकांसाठी दरमहा गॅस बुक करण्यासाठीचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार एका ग्राहकाला महिन्याला केवळ दोन गॅस बुक करता येणार आहेत.
यापूर्वी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी घरगुती ग्राहकांसाठी कुठलीही मर्यादा नव्हती. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांकडून हा नियम लागू करण्यामागे एक महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे. ते कारण म्हणजे घरगुती गॅसचा सिलेंडर हा व्यावसायिक गॅस सिलेंडरपेक्षा स्वस्त असतो. त्यमुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातो. त्यामुळे घरगुती सिलेंडरच्या बुकिंगवर मर्यादा आणण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार ग्राहकांना महिन्याला दोन सिलेंडर मिळू शकतात. तसेच वर्षभरात मिळणाऱ्या सिलेंडरची कमाल संख्या ही १५ पेक्षा अधिक असणार नाही. मात्र वर्षभरात १५ पेक्षा अधिक सिलेंडर घेण्यावर कुठलीही बंदी नाही. पण १५ पेक्षा अधिकचा सिलेंडर घ्यायचा असेल तर त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे ही दाखवावी लागतील. त्यामध्ये रेशन कार्ड, कुटुंबातील सदस्यांची संख्या यांचं विवरण यासंदर्भातील कागदपत्रे ही सादर करावी लागतील. या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर १५ पेक्षा अधिक सिलेंडर मिळू शकतील.
ही नवी व्यवस्था सर्व तेल आणि ग्राहक कंपन्यांसाठी करण्यात आली आहे. आयओसीएल, एचपीसीएलसोबतच बीपीसीएलच्या सर्व बिगर उज्ज्वला ग्राहकांना हा नियम लागू होणार आहे. नवे नियम लागू करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही आहे.