Independence Day : सियाचीनमधील जवानांची आव्हानं जाणून घेणार कॅप्टन कूल धोनी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 08:29 AM2019-08-15T08:29:49+5:302019-08-15T08:33:04+5:30
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे.
श्रीनगर - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. शिवाय येथील वेल्फेअर प्रशिक्षण केंद्रात कसा सराव करून घेतला जातो याचीही माहिती तो घेणार आहे. हिमालयाच्या पूर्व काकाकोरम भागात सियाचीन आहे. येथील तापमान हे शून्य अंशापेक्षा कमी असते आणि गोठून टाकणाऱ्या थंडीतही भारतीय जवान दिवसरात्र पहारा देतात. सैन्याची ही आव्हानं जाणून घेण्यासाठी धोनी सियाचीनला जाणार आहे.
धोनीला भारतीय सैन्यानं लेफ्टनन कर्नल हे पद दिले आहे. गेले 15 दिवस तो भारतीय सैन्याच्या 106 TA बटालियनसोबत जम्मू काश्मीरमध्ये पहारा देत आहे. 15 दिवसांच्या सैन्यसेवेसाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, धोनी आज (15 ऑगस्ट) सियाचीन येथे दाखल होणार आहे. तेथील सियाचीन युद्ध स्मृती स्थळालाही तो भेट देणार आहे.
.@msdhoni spending time with our Jawans at Army Hospital earlier today!💙#IndianArmy#MSDhoni#Dhonipic.twitter.com/v1YIzDhWkv
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) August 14, 2019
स्वातंत्र्यदिनी धोनी लेह येथे झेंडावंदन करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, धोनीनं 12 तारखेलाच लेह येथील सराव सत्रात सहभाग घेतला. त्यानं भुडकुट येथील आर्मी गुडवील स्कूललाही भेट दिली होती.
धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015 मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली आहे.