लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांच्याकडे मोठी जबाबदारी, उद्यापासून पदभार स्वीकारणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:42 IST2024-07-31T16:36:50+5:302024-07-31T16:42:55+5:30
Lt Gen Sadhna Saxena Nair : या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत.

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांच्याकडे मोठी जबाबदारी, उद्यापासून पदभार स्वीकारणार!
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर उद्या म्हणजेच १ ऑगस्टला लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या 'महासंचालक' म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. यापूर्वी, एअर मार्शल पदावर पदोन्नती झाल्यानंतर हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या (सशस्त्र दल) महासंचालक पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
गेल्या वर्षी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या (सशस्त्र दल) महासंचालक म्हणून साधना सक्सेना नायर यांनी पदभार स्वीकारला होता. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, "हवाई दलाच्या अधिकारी असलेल्या एअर मार्शल साधना सक्सेना नायर प्रभावीपणे सेवा करणाऱ्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हवाई दलातील विविध पदांवर काम केल्यानंतर त्या एअर मार्शल पदापर्यंत पोहोचल्या. पदभार स्वीकारताना हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी देखील उपस्थित होते."
लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी त्यांचं शालेय शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंट (प्रयागराज), लोरेटो कॉन्व्हेंट (लखनऊ) नंतर तेजपूर, गोरखपूर, कानपूर आणि चंदीगड अशा विविध ठिकाणच्या शाळांमध्ये घेतलं. पुढे जाऊन त्यांनी पुण्याच्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर डिसेंबर १९८५ मध्ये त्या भारतीय हवाई दलात दाखल झाल्या. या व्यतीरिक्त त्यांनी फॅमिली मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. तसंच, AIIMS नवी दिल्ली येथे दोन वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रमही सुद्धा पूर्ण केला आहे.
याचबरोबर, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी सीबीआरएन (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर) युद्ध आणि लष्करी वैद्यकीय नैतिकतेचं परदेशात प्रशिक्षण घेतलं. वेस्टर्न एअर कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य वैद्यकीय अधिकारी होत्या. याशिवाय, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांना विशिष्ट सेवा पदकही मिळालं आहे.