पूर्वेला ‘लुबान’, पश्चिमेला ‘तितली’; एकाचवेळी देशाभोवती दोन चक्रीवादळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:06 PM2018-10-09T21:06:05+5:302018-10-09T21:10:04+5:30

पश्चिम भारतातील बहुतांश राज्यात अनेक ठिकाणी पाच दिवस पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज

luban at east titli at west two cyclone near india weather department issues alert | पूर्वेला ‘लुबान’, पश्चिमेला ‘तितली’; एकाचवेळी देशाभोवती दोन चक्रीवादळे

पूर्वेला ‘लुबान’, पश्चिमेला ‘तितली’; एकाचवेळी देशाभोवती दोन चक्रीवादळे

Next

पणजी: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे लुबान चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर बंगालच्या खाडीत आणखी एक ‘तितली’ चक्रीवादळ उठल्यामुळे हवामानासंबंधी संस्थांनी सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. पूर्व, मध्य, दक्षिण व पश्चिम भारतातील बहुतांश राज्यात अनेक ठिकाणी पाच दिवस पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

तासाला १०० ते ११० किलोमीटर वेगाने ओरिसा किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेले तितली चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाले असून ११ ऑक्टोबरच्या पहाटे ते ओरिसाच्या गोलकपूर किनाऱ्याला ताशी ११० ते १२५ किलोमीटर आदळेल असा अंदाज हवामान खात्याच्या चक्रीवादळ विभागाने वर्तवला आहे. त्यापूर्वीचे तीन दिवस व त्या नंतरचे दोन दिवस म्हणजेच ५ दिवस या चक्रीवादळाचा परिणाम राहणार आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.  

दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी ११० किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी  रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरत आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. 

खोल समुद्रात न जाण्याचा इशारा
चक्रीवादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना  ७४ किलोमीटरपेक्षा अधिक दूर न जाण्याचा इशारा तटरक्षक दलाने दिला आहे. एरव्ही ९ ऑक्टोबरपर्यंत हा इशारा मर्यादित होता. परंतु प्राप्त परिस्थितीत चक्रीवादळाची वाढलेली गती लक्षात घेता हा इशारा १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.
 

Web Title: luban at east titli at west two cyclone near india weather department issues alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.