...म्हणून 'ती' स्वत:चेच केस खात होती; मुलीच्या पोटात तब्बल 2 किलोची गाठ पाहून डॉक्टरही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 10:29 AM2021-09-04T10:29:12+5:302021-09-04T10:38:11+5:30
lucknow bunch of 2 kg of hair came out of 17 year old girl : रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या पोटातून केसांचा मोठा पुंजका बाहेर काढला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका मुलीच्या पोटातून जवळपास दोन किलोची केसांची मोठी गाठ बाहेर काढण्यात आली आहे. बलरामपूरच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या पोटातून केसांचा मोठा पुंजका बाहेर काढला आहे. ही 17 वर्षीय मुलगी गेल्या दोन वर्षांपासून फारच कमकुवत झाली होती. तिला केस गळतीचा त्रास होत असल्याचंही कुटुंबीयांच्या लक्षात आलं. मात्र तिला याबाबत विचारल्यावर ती काहीही उत्तर देत नसे. साधारणतः दहा दिवसांपूर्वी तिने आपल्याला तीव्र पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली.
मुलीला होणाऱ्या या त्रासानंतर कुटुंबीयांनी तिला बलरामपूर रुग्णालयात दाखल केलं. शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. एस. आर. समदार यांनी तिची तपासणी केली. अल्ट्रासाऊंड तपासणी दरम्यान डॉक्टरांना मुलीच्या पोटात एक गाठ दिसली. यानंतर, डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये पुन्हा एक मोठी गाठ दिसून आली. पुढे एन्डोस्कोपनंतर तिच्या पोटात केसांचा पुंजका असल्याचं आढळलं. तिच्या पोटातील केसांच्या पुंजक्याचं रूपांतर चक्क एका गाठीत झालं होतं. याचं वजन सुमारे दोन किलो होतं.
मुलगी जन्मापासून मानसिक आजाराने ग्रस्त
मुलीच्या पोटात 20 सेमी रुंदीचा हा केसांचा पुंजका पाहून डॉक्टर देखील हैराण झाले. डॉक्टरांनी मुलगी जन्मापासून मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर या मुलीला आता पोटदुखीची कोणतीही समस्या जाणवत नसून तिची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, या गाठीमुळे तिच्या पोटातून लहान आतड्यापर्यंतची जागा पूर्णपणे बंद झाली होती. परिणामी, अन्न पुढे जाऊ शकत नव्हतं. ज्यामुळे तिचं साधारणतः 32 किलो वजन कमी झालं होतं. दुसरीकडे ही मुलगी ट्रायकोबेझार (Trichobezoar) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. या आजारात रुग्ण स्वतःचे केस तोडून खातात.
पोटात दुखू लागल्याने हा धक्कादायक प्रकार उघड
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या पोटात केसांचा एक पुंजका होता. मानवी पचनसंस्थेत वर्षानुवर्षे केस पचत नाहीत. त्यामुळे ते पोटात जमा होऊन राहिले. म्हणूनच यावर उपचार करण्याचा एकमेव मार्ग हा शस्त्रक्रिया हाच होता. दहा दिवसापूर्वी 17 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सर्जरीनंतर मुलीची प्रकृती आता ठीक आहे. तसेच तिचा त्रास देखील कमी झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक रुग्णांमध्ये अशाप्रकराची लक्षणं दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! रुग्णालयात मोठी गर्दी; रुग्णसंख्या अचानक वाढल्याने बेडची कमतरता; जमिनीवर झोपवून करताहेत उपचार#marriage#FoodPoisoninghttps://t.co/zfdH1M3Ypo
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021