निष्काळजीपणाचा कळस! नर्सच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू पण कुटुंबीयांना वेगळंच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:58 PM2022-04-27T16:58:50+5:302022-04-27T17:05:50+5:30
नर्सच्या हातातून पडून नवजात बाळाचा मृत्यू झाला पण हे प्रकरण लपवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने खोटं सांगितलं.
नवी दिल्ली - लखनौमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका रुग्णालयाने निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. नर्सच्या हातातून पडून नवजात बाळाचा मृत्यू झाला पण हे प्रकरण लपवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने खोटं सांगितलं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मात्र डोक्याला मार लागल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तसेच बाळाच्या आईने नेमकं काय घडलं हे सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बाळाच्या आईने नर्सच्या हातातून बाळ पडल्याचं सांगितलं आणि या प्रकरणाची पोलखोल झाली. याप्रकरणी पीडित कुटुंबाने रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दिली असून पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील चिनहटमधील जुग्गौर येथील रहिवासी असलेल्या जीवन राजपूत यांनी 19 एप्रिल रोजी त्यांच्या गर्भवती पत्नीला प्रसूती वेदना झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. रात्री 10 ते 11 च्यादरम्यान पत्नीने मुलाला जन्म दिला.
जन्मानंतर नवजात बाळ मरण पावलं. लेबर रूममध्ये पत्नीने आरडाओरडा सुरू केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. बाहेर उभ्या असलेल्या पतीसह अन्य नातेवाईकांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं पण शेवटी कुटुंबीयांनी रुममध्ये प्रवेश केला. तेव्हा पत्नीने पतीला नेमकं काय घडलं ते सांगितलं. बाळ सुदृढ, निरोगी आणि सुरक्षित जन्माला आलं होतं. मात्र तिथल्या नर्सने त्याला एका हातानं धरलं होतं, निष्काळजीपणामुळे बाळ तिच्या हातातून खाली पडलं आणि त्याचा मृत्यू झाला आहे.
नर्सच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू झाला, ही बाब लपवण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी बाळाचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र, बाळाच्या आईने लेबर रुममध्ये काय घडलं, याची माहिती कुटुंबीयांना दिली, त्यातून नर्सची चूक असल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पीएम रिपोर्टमध्ये, मुलाचा पडल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.