योगींच्या शपथविधी सोहळ्यात सिनेस्टारही सहभागी होणार; 'या' सेलिब्रिटींना पाठवले निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 02:08 PM2022-03-24T14:08:20+5:302022-03-24T14:09:50+5:30
Yogi Adityanath to take oath on 25 march as Chief Minister : आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलीवूडचे (Bollywood) सिनेस्टारही उपस्थित राहणार आहेत.
लखनऊ : योगी सरकारच्या (Yogi Government) दुसऱ्या टर्मचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उद्योगपती तसेच साधू संतांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे.
एवढेच नाही तर योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलीवूडचे (Bollywood) सिनेस्टारही उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये 25 मार्च रोजी संध्याकाळी 4.00 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला सुमारे 70 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या तयारीला अंतिम टच देण्यात प्रशासकीय कर्मचारी व्यस्त आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेतेमंडळी आणि उद्योगपतींव्यतिरिक्त काही बॉलिवूड कलाकार आमंत्रित करण्यात आले आहे. योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, कंगना रणौत, अजय देवगण, बोनी कपूर, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित केले जात आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, देशभरातील बडे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री योगी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
उद्योगपती आणि 49 कंपन्यांनाही निमंत्रण
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि 49 कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल.
भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची यादी...
शिवराज सिंह चौहान – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
मनोहर लाल खट्टर- हरयाणाचे मुख्यमंत्री
पेमा खांडू - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
एम एन वीरेन सिंग – मणिपूरचे मुख्यमंत्री
जय राम ठाकूर - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
विप्लब देवजी - त्रिपुराचे मुख्यमंत्री
प्रमोद सावंत – गोव्याचे मुख्यमंत्री
हिम्मत बिस्वा शर्मा- आसामचे मुख्यमंत्री श्री
बसवराज बोम्मई - कर्नाटकचे मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेल - गुजरातचे मुख्यमंत्री
पुष्कर सिंह धामी – उत्तराखंडचे मुख्यमंत्री
तारकेश्वर सिंह - बिहारचे उपमुख्यमंत्री
रेणू देवी - बिहारच्या उपमुख्यमंत्री
वाईपॅटन - नागालँडचे उपमुख्यमंत्री
चोनामीन - अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री
जिष्णु देव वर्मा जी- त्रिपुराचे उपमुख्यमंत्री