Lucknow Encounter Case: पोलीस काका आम्हाला गोळी मारू नका, पोस्टर्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 10:09 AM2018-10-01T10:09:01+5:302018-10-01T10:21:23+5:30
उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये विवेक तिवारीची हत्या झाल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे.
लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये विवेक तिवारीची हत्या झाल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे. लखनऊ, वाराणसीमधल्या अनेक गाड्यांवर विवेक तिवारी अमर रहे असे स्टिकर्स झळकले आहेत. तसेच सोशल मीडियावरही काही पोस्टर्स व्हायरल झाली आहेत. यात काही चिमुकलेही हातात पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय.
या पोस्टर्सवर लिहिलंय की, तुम्ही गाडी थांबवण्यास सांगितल्यास बाबा गाडी थांबवलीत, प्लीज गोळी मारू नका. या प्रकारानंतर लखनऊमधले नागरिक भीतीच्या दडपणाखाली आहेत. ज्या पद्धतीनं विवेकला गाडी न थांबवल्यामुळे गोळी घालण्यात आली, त्यामुळे लहानग्यांपासून मोठ्यापर्यंतच्या मनात एका अनामिक भीतीनं घर केलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मृत विवेकच्या कुटुंबीयांशी फोनवरून बातचीत करून संवेदना व्यक्त केली आहे. तुमच्या कुटुंबीयांना शक्य होईल तेवढी मदत करेन, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला या, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली होती. रात्री उशिरा विवेक स्वतःच्या सहका-याला बरोबर घेऊन कामावरून घरी परतत होता. त्याच दरम्यान गोमतीनगर परिसरात दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु विवेकनं गाडी थांबवली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात एक गोळी विवेकच्या डोक्याला लागली अन् विवेकचा मृत्यू झाला.