भयंकर! लखनौच्या PGI ऑपरेशन थिएटरला भीषण आग; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:31 PM2023-12-18T16:31:49+5:302023-12-18T16:44:09+5:30
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
लखनौच्या पीजीआय रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महिला आणि मुलाचा समावेश आहे. या दोघांवरही उपचार सुरू होते. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पीजीआयमध्ये सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली. आगीमुळे ऑपरेशन थिएटर आणि इमारतीत धुराचे लोट पसरले होते. रुग्ण, कर्मचारी आणि अटेंडंटना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरुवातीला शॉर्टसर्किट हे कारण सांगितलं जात आहे. सध्या पीजीआय प्रशासनाचे म्हणणे आहे की आत कोणीही अडकलेले नाही, सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. पीजीआयमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच डीआयजी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी सांगितलं.
ब्रजेश पाठक यांनी दिले तपासाचे आदेश
याप्रकरणी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, पीजीआयमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णालयात आगीच्या कारणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. सरकार मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे. शक्य ती सर्व मदत केली जाईल.