"आई, आजनंतर मी तुला भेटणार नाही"; लेकाने उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:41 IST2025-04-03T19:40:30+5:302025-04-03T19:41:09+5:30
महेश निषाद हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता.

फोटो - आजतक
लखनौमधील एका निवृत्त न्यायाधीशाच्या घरी काम करणाऱ्या महेश निषाद नावाच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेशच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वी महेशने एक व्हिडीओ बनवला होता ज्यामध्ये तो त्याच्या आईला म्हणाला की, "आई, आजनंतर मी तुला भेटणार नाही कारण मी आत्महत्या करणार आहे."
महेश निषाद हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता. त्याचे वडील दिव्यांग आहेत. त्याच्या कमाईवर संपूर्ण घर चालत असे. त्याला साडे बारा हजार पगार होता, पण अलीकडेच त्याच्यावर ६ लाख रुपये चोरल्याचा आरोप झाला. याचा त्याला खूप त्रास होऊ लागला. निवृत्त न्यायाधीशांच्या घरात चोरी झाल्यानंतर महेशला दोषी ठरवण्यात आल्याचा आरोप महेशची पत्नी कविताने केला.
महेशचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. कविताच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा गेल्या चार वर्षांपासून एका निवृत्त न्यायाधीशाच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करत होता. न्यायाधीशाच्या घरातून ६ लाखांची चोरी झाली होती, ज्याचा आरोप महेशवर करण्यात आला. १७ मार्च रोजी निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीने त्याला त्यांच्या घरी बोलावलं. चौकशीदरम्यान, महेशला मारहाण करण्यात आली आणि नंतर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
मानसिक ताण सहन न झाल्याने महेशने स्वतःच्या घरात गळफास घेतला. महेशची १७ वर्षांची मुलगी आणि १३ वर्षांच्या मुलाने फक्त एकच मागणी केली आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे. "मला माझे वडील परत हवे आहेत" असं मुलगा सातत्याने म्हणत आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.