संतापजनक! गर्भवती महिलेला रुग्णालयातून बाहेर काढलं; महिलेने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 02:24 PM2022-03-13T14:24:16+5:302022-03-13T14:32:39+5:30
रेणूने तिला प्रसूतीकळा सुरू झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही डॉक्टरांनी रेणूला बाहेर जाण्यास सांगितलं. रेणू बाहेर मोकळ्या मैदानात वेदनेने कळवळत होती.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सिधौली आरोग्य केंद्रामध्ये शनिवारी एक अत्यंत असंवेदनशील घटना घडली आहे. गोंदलामऊमधील शाहपूर निवासी अन्नू आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आशा सेविकासोबत रुग्णवाहिकेने रुग्णालयामध्ये आला होता. यावेळी लेबर रूममधील एका महिला डॉक्टरने 9.30 ची एन्ट्री करून बाहेर जाण्यास सांगितलं. रेणूने तिला प्रसूतीकळा सुरू झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही डॉक्टरांनी रेणूला बाहेर जाण्यास सांगितलं. रेणू बाहेर मोकळ्या मैदानात वेदनेने कळवळत होती.
काही वेळानंतर रेणूला प्रचंड त्रास सुरू झाला. यावेळी आजूबाजूला महिलांनी मदत करीत महिलेला घेराव घातला आणि रुग्णालयाच्या बाहेरच रेणूने एका बाळाला जन्म दिला. यानंतर रुग्णालयात खळबळ उडाली. तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाळाला रुग्णालयात आणलं. रेणूचे पती अन्नूने सांगितलं की, सुरुवातीला महिला डॉक्टरने बाहेर जाण्यास सांगितलं. त्याच वेळी पत्नीला प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तातडीने आम्ही रुग्णवाहिका घेऊन आलो होतो. मात्र प्रसूतीकळा सुरू असतानाही डॉक्टरांनी मदत केली नाही.
दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्याविरोधात कारवाई केली जाणार
रुग्णालयाच्या बाहेर मोकळ्या जागेत महिलेची प्रसुती झाली. या रुग्णालयात 4 महिला डॉक्टर आणि 13 स्टाफ नर्स तैनात आहेत. तरीही प्रसूतीकळा सुरू असताना आलेल्या महिलेला अशी वागणूक देण्यात आली. या प्रकरणात तपास सुरू आहे. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे अधीक्षकांनी सांगितलं. या घटनने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.