आज्जीबाईंनी 'वॉकिंग स्टिक'नं चोरांना पळवून लावलं, पोलीस महासंचालकही झाले 'धाकड' आजींचे 'फॅन'!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:08 PM2021-09-08T12:08:31+5:302021-09-08T12:09:49+5:30
मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजीबाईंना चोरट्यांच्या टोळक्यानं चोरीच्या उद्देशानं गाठलं खरं पण घडलं उलटंच.
लखनऊच्या एक 'धाकड' आजीबाई सद्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक (डीजीपी) मुकुल गोयल देखील या 'धाकड' आजीबाईंचे फॅन झाले आहेत. त्यांनी स्वत: आजीबाईंना व्हिडिओ कॉल करत त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. तर त्याचं झालं असं की या आज्जीबाईंनी न भीता अन् जीवाची पर्वा न करता चोरट्यांना पळवून लावलंय.
लखनऊच्या पीजीआय ठाणे परिसरातील वृंदावन कॉलनमध्ये राहणाऱ्या ७२ वर्षीय देवता वर्मा यांना काही दिवसांपूर्वी एका चोरट्यांच्या टोळीनं गाठलं होतं. आपल्या समवयक्स महिलेसोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या देवता वर्मा यांना चोरट्यांच्या टोळक्यानं अडवलं होतं. एका मोटारसायकवरुन आलेले चोर आजीबाईंच्या जवळ आले आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. आज्जीबाईंनी न घाबरता चोरट्यांचा प्रतिकार केला. इतकंच नव्हे, तर चोरट्यांना धक्का देऊन त्यांना जमिनीवर पाडलं आणि त्यांनी आपली सोनसाखळी चोरट्यांच्या हातातून हिसकावून घेतली. त्यानंतर हातातील 'वॉकिंग स्टिक'नं चोरट्यांना मारण्यास सुरुवात केली. आज्जीबाईंचं धाडस पाहून चोरटेही गांगरुन गेले आणि त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. काहीवेळानं परिसरातील इतर महिला धावून आल्या. पण तोवर चोरटे पसार झाले होते. देवता वर्मा यांनी बराच वेळ चोरट्यांचा प्रतिकार केला होता. यात त्यांच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळावर पोहोचले. देवता वर्मा यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे. आजीबाईंच्या शौर्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त देखील आजींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. आजींची विचारपूस केली आणि लवकरात लवकर चोरट्यांना अटक करण्याचं आश्वासन देखील दिलं. पोलीस महासंचालक मुकुल गोयल यांना याबाबत कळताच त्यांनी आजीबाईंशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधला आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. नागरिकांनी सतर्क आणि जागरुक राहण्याचा एक संदेश तुम्ही समाजाला दिला आहे, असंही मुकुल गोयल म्हणाले.