हुंड्यात मिळाली म्हैस! महिलेने लढवली भारी शक्कल; सुरू केला व्यवसाय, अनेकांना दिला रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:19 PM2022-10-22T12:19:48+5:302022-10-22T12:20:30+5:30
एका छोट्याशा गावात राहणाऱ्या महिलेने शक्कल लढवली. आपल्या जिद्दीच्या जोरावर व्यवसाय सुरू केला आणि आता अनेकांना रोजगार देखील मिळवून दिला.
माहेरच्यांनी एका महिलेल्या हुंड्यात म्हैस दिली पण याचा पुरेपुर वापर महिलेने केल्याची प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. मेहनत आणि हुशारीचा अचूक वापर करून महिलेने नवी झेप घेतली आणि व्यवसाय सुरू केला. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या महिलेने शक्कल लढवली. आपल्या जिद्दीच्या जोरावर व्यवसाय सुरू केला आणि आता अनेकांना रोजगार देखील मिळवून दिला. महिलेच्या हुशारीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिटानी देवी असं या महिलेचं नाव आहे. बिटानी या पाचवी पास असून उत्तर प्रदेशमधील निगोहा येथील मीरकनगर गावात त्या राहतात. 37 वर्षांपूर्वी त्यांना लग्नात हुंडा म्हणून म्हैस मिळाली होती. तेव्हा त्यांनी 1985 मध्ये स्वतःची दुधाची डेअरी काढायचा विचार केला. त्यांच्या या कल्पनेवर कुटुंबातील सदस्यांनीही सहमती दर्शवली. कुटुंबाची साथ आणि मदत मिळाल्यावर बिटानीदेवी यांनी स्वतःची डेअरी सुरू केली.
आज बिटानी यांना त्यांच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. आज त्यांनी 12 महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. एका म्हशीपासून सुरू केलेल्या व्यवसायात आता त्यांचा चांगलाच जम बसला आहे. सध्या त्यांच्याकडे 16 गायी, 11 म्हशी आहेत. तर दिवसाला 100 ते 120 लीटर दूध मिळतं. गुरांना चारा देण्यापासून ते दूध काढण्यापर्यंतचे काम बिटानीदेवी एकट्या करतात.
बिटानी यांचे पती आधी शिक्षक होते. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. ते अजूनही बिटानी देवी यांचा उत्साह वाढवण्याचे काम करतात, असं त्या म्हणतात. बिटानी देवी एका कंपनीला दूध विकतात. त्याचबरोबर त्यांच्यासोबत अन्य महिला व पुरुषही जोडले गेले आहेत. बिटानी देवी यांना 2005 पासून सलग यांना गोकुळ पुरस्कार मिळाला आहे. तसेच प्रदेश स्तरावर मिळणाऱ्या पुरस्कारांमध्ये अनेकदा त्या टॉप 5 मध्ये असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"