मुगलसराय रेल्वे स्टेशननंतर आता 'या' तीन विमानतळांची नावं बदलणार योगी सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 09:27 AM2018-08-16T09:27:06+5:302018-08-16T09:36:51+5:30
मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे.
लखनऊः मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे. बरेली, कानपूर आणि आग्रा विमानतळांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव योगी सरकारनं केंद्राला दिला आहे.
एका प्रवक्त्याच्या माहितीनुसार, योगी सरकारनं दिलेल्या प्रस्तावात बरेली विमानतळाचं नाव 'नाथ नगरी' करण्याचे प्रस्तावित आहे. नाथ नगरी हे बरेली शहराचं जुनं नाव आहे.
नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी गोरखपूरमधल्या भारतीय हवाईदलाच्या तळाचंही नाव बदललं आहे. त्या हवाईतळाचं नाव महायोगी गोरखनाथ नावावरून ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ संप्रदायाचं प्रेरणास्थान असलेल्या गोरक्षनाथ पीठाचे महंतही आहेत.
उत्तर प्रदेशचे नागरी उड्डाण मंत्री नंद गोपाल नंदी म्हणाले, तीन विमानतळांचं नावं बदलण्याची मागणी जुनीच आहे. आम्ही या विमानतळांची नावं बदलण्याचा केंद्राकडे आग्रह केला आहे. त्यासंदर्भात आमची नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिका-यांबरोबर लवकरच बैठक होणार आहे. कानपूरमधल्या चकेरी विमानतळाचं नाव स्वातंत्र्य सेनानी गणेश शंकर विद्यार्थी यांच्या नावावरून ठेवावं, असं प्रस्तावित आहे. कानपूरला पूर्वी कान्हा पूरच्या नावानं ओळखलं जात होतं. सचेंडीचे राजा हिंदू सिंह यांनी कान्हा पूरची स्थापना केली होती. आग्रा विमानतळाचं नाव दीनदयाल उपाध्याय यांच्या नावावरून ठेवण्याचंही प्रस्तावित आहे.