हृदयद्रावक! 8 महिन्यांच्या बाळाने दिला आई-वडील आणि आजीला मुखाग्नी, सर्वांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 11:17 AM2023-05-02T11:17:48+5:302023-05-02T11:19:09+5:30
मावशीने चिमुकल्याला कडेवर घेऊन स्मशानभूमीत सर्व अंत्यसंस्कार पूर्ण केले. हे पाहून तेथे उपस्थित लोकांचे डोळे पाणावले.
पंजाबमधील लुधियाना शहरातील स्मशानभूमीत सोमवारी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालं. एका 8 महिन्याच्या चिमुकल्याने आई-वडील आणि आजीला मुखाग्नी दिला. लुधियाना गॅस दुर्घटनेत मुलाने आपले कुटुंब गमावले आहे. मावशीने चिमुकल्याला कडेवर घेऊन स्मशानभूमीत सर्व अंत्यसंस्कार पूर्ण केले. हे पाहून तेथे उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. पंजाबमधील लुधियाना शहरात रविवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला.
मृतांमध्ये सौरव गोयल, त्यांची पत्नी प्रीती गोयल आणि आई कमलेश यांचाही समावेश आहे. सौरव आणि प्रीती यांचा 8 महिन्यांचा मुलगा आर्यन या घटनेतून थोडक्यात बचावला. मावशीच्या कडेवर असलेल्या आर्यनने जेव्हा मुखाग्नी दिला तेव्हा सर्वांच्याच काळजात चर्र झालं. तो आई-वडिलांच्या मृतदेहाकडे एकटक पाहत होता. मृताच्या नातेवाइकांनी सांगितले की, सौरव हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो गेल्या काही वर्षांपासून पंजाबमधील लुधियाना येथे राहत होता.
सौरव गोयल आणि प्रीती यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि हे जोडपं 8 महिन्यांपूर्वीच पालक झाले होते. रविवारी लुधियानाच्या ग्यासपुरा भागात विषारी वायूची गळती झाल्याने सौरव गोयल आणि त्यांची पत्नी आणि वृद्ध आई यांचा मृत्यू झाला. 8 महिन्यांचा आर्यन या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला. लुधियानामध्ये झालेल्या गॅस गळतीप्रकरणी प्रशासन कोणत्याही ठोस निकालापर्यंत पोहोचू शकलेले नाही.
सत्य समोर यावे यासाठी पोलिसांनी याप्रकरणी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या वायूचा स्रोत लवकरात लवकर शोधण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू यांनी सांगितले. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने निष्काळजीपणा दाखवल्यास त्यांचेही नाव या एफआयआरमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"