हरयाणातील लुखी गावात होते फक्त शिक्षणाची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:07 AM2019-11-13T04:07:38+5:302019-11-13T04:07:41+5:30
हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील लुखी गावामध्ये मुलींचा सन्मान करणाऱ्या आगळ्या परंपरा पाळल्या जातात.
बलवंत तक्षक
चंदीगड : हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील लुखी गावामध्ये मुलींचा सन्मान करणाऱ्या आगळ्या परंपरा पाळल्या जातात. या गावात शिक्षणाची पूजा होते. तिथे कोणत्याही देवी-देवतेचे एकही मंदिर नाही. मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलांच्या जन्मावेळी करतात, तसे विहीरपूजन केले जाते. येथील गावकरी जातिवाचक आडनावे लावत नाहीत.
विवाहाच्या वेळी कुटुंबातील कोणताही सदस्य पुरोहित बनतो. या गावातील मुलींनी विविध क्षेत्रांत यश मिळविले आहे. देशांतील इतर गावांसाठी लुखी हे आदर्श उदाहरण आहे. सुमारे चार हजार लोकसंख्येच्या या गावात दर तिसºया घरातील मुलगी सरकारी नोकरीत आहे. अशा ४०० मुली असून, त्यातील ३२५ जणी शिक्षिका आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत लुखी गावातील मुलींना शिक्षण घेण्यास बंदी होती. गावकऱ्यांपैकी जे कोणी आपल्या मुलीला शिकविण्याचा प्रयत्न करीत, त्यांना पंचायतीसमोर माफी मागावी लागत असे. अशा वेळी सोहनलाल यादव या सुशिक्षित गृहस्थाचे या गावात आगमन झाले. यादव यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली.
लुखीच्या गावकºयांनी प्रारंभी विरोध केला, तेव्हा यादव यांनी आपल्या कुटुंबातील मुलींना शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतरही चार वर्षांपर्यंत गावकºयांचा विरोध कायम होता.
पंजाबपासून वेगळे झाल्यानंतर १९६६ साली हरयाणा नव्या राज्याच्या रूपाने भारताच्या नकाशावर झळकले. तिथे शिक्षण खात्याने सुरू केलेल्या भरतीत लुखी गावातील अनेक युवकांची शिक्षकपदी नियुक्ती
झाली.
त्यामध्ये तेथील दोन महिलांचा समावेश होता. त्यानंतर हरयाणामध्ये जेव्हा शिक्षकांची भरती होते, त्यामध्ये लुखी गावातील महिला निश्चितच असतात.
>लग्नातही शिक्षकाला पसंती
लुखी गावचे सरपंच चंद्रहास यांनी सांगितले की, आमच्या गावातील लोक आडनावात जातीचा उल्लेख न करता नावापुढे सिंह किंवा कुमार, असे शब्द वापरतात. एखाद्या मुलाचे लग्न ठरते, त्यावेळी गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती व सर्वात कमी वयाचे बालक, अशा दोघांच्या वतीने १०-१० रुपये भेट म्हणून त्या मुलाला दिले जातात. लुखी गावातील सेवानिवृत्त जिल्हा शिक्षण अधिकारी सुविधा यादव यांनी सांगितले की, येथील मुलगा-मुलगी विवाह ठरविताना प्राथमिक शिक्षक असलेल्या स्थळाला पहिली पसंती देतात.