कोरोनानंतर लक्झरी रेल्वे पुन्हा येणार रुळावर; सप्टेंबरपासून होतेय नियोजन, ३०-३५ संख्येत प्रवास सहज शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:27 AM2022-04-15T07:27:23+5:302022-04-15T07:27:41+5:30
कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या रॉयल राजस्थान, महाराजा एक्स्प्रेस, पॅलेस ऑन व्हिल्स, गोल्डन चॅरिएट आणि डेक्कन ओडिशी लक्झरी रेल्वे पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.
अनुभा जैन
नवी दिल्ली :
कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या रॉयल राजस्थान, महाराजा एक्स्प्रेस, पॅलेस ऑन व्हिल्स, गोल्डन चॅरिएट आणि डेक्कन ओडिशी लक्झरी रेल्वे पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.
आरटीडीसीच्या अधिकाऱ्याने एका मुलाखतीत म्हटले की, येत्या सप्टेंबर महिन्यापासून आम्ही प्रवासाबाबत असलेल्या कोविड निर्बंधांसह रेल्वे सुरू करण्याच्या नियोजनात आहोत. गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे सेवा बंदच होती. फेस मास्क, सामाजिक अंतर आदी निर्बंधांसह सध्याचे वातावरण हे ३०-३५ या संख्येत लोकांना प्रवास करू देईल. महाराजा एक्स्प्रेस रेल्वेच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘सध्या आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होतोय, ही मोठी घटना आहे, कारण रेल्वेतून प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी हे विदेशांतील आहेत.
रेल्वेसेवा येत्या ऑक्टोबरपासून सुरू होईल, कारण त्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग आधीच झालेली आहे.’ आरटीडीसीच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘वर्ष २०१९-२०२० मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी केलेले बुकिंग कोविड-१९ मुळे रद्द झाले. रेल्वे विभागाने प्रवाशांना त्यांचा प्रवास पुढील हंगामात करण्याचा किंवा बुकिंग कॅन्सलेशन चार्जेसशिवाय पैसे परत मागण्याचा पर्याय दिला होता. बुकिंग हे एजंटसकडून किंवा जीएसए रिटेल सर्व्हिसकडून झाल्यामुळे ट्रिप्स रद्द झाल्यानंतर रेल्वे विभाग प्रवाशांपर्यंत पोहोचू शकला नाही.
राजेशाही थाटात प्रवास
- आता कोविड-१९ जवळपास संपल्यासारखा आहे. रेल्वे आणि विमान प्रवास नव्या मार्गदर्शन सूचनांसह व उत्तम सेवांसह सुरू होत आहे.
- विदेशी पर्यटक पुन्हा आल्यामुळे लक्झरी रेल्वे पुन्हा धावू लागल्या आहेत.
- थोडक्यात सांगायचे तर प्रवासी राजेशाही थाटात या लक्झरी रेल्वेंतून प्रवासाचा आनंद घेऊ शकतील, असे अधिकारी म्हणाले.