एम.फिल पदवी मान्यताप्राप्त नाही, कोणीही प्रवेश घेऊ नका: यूजीसी, विद्यार्थ्यांना केले सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 07:38 AM2023-12-28T07:38:27+5:302023-12-28T07:39:41+5:30
विद्यापीठांना दिला इशारा; २०२२ पर्यंतचे प्रवेश वैध.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) ही मान्यताप्राप्त पदवी नाही. त्यामुळे एम.फिल अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांना सावध केले आहे. तसेच हा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या व त्याला प्रवेश देणाऱ्या विद्यापीठांना यूजीसीने कडक इशारा दिला आहे.
एम.फिल. अभ्यासक्रमासाठी काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. एम.फिल. ही मान्यताप्राप्त पदवी नाही. यूजीसीचा पीएच.डी. पदवीसाठी किमान मानके आणि प्रक्रिया विनियम, २०२२च्या नियम क्रमांक १४मध्ये म्हटले आहे की, उच्च शिक्षणसंस्थांना एम.फिल. अभ्यासक्रम सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही माहिती यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिली.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एम.फिल. अभ्यासक्रमासाठी सुरू केलेली प्रवेशप्रक्रिया तत्काळ बंद करावी, असे आदेश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. मात्र २०२२ पर्यंतचे प्रवेश वैध असणार आहेत.
एम.फिल हरवून बसला स्वत:ची शान
किमान मानक आणि पीएच.डी. पदवी पुरस्कार प्रक्रिया नियम, २०२२चा मसुदा यूजीसीच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला होता. पुढील शैक्षणिक वर्षापासून एम.फिल बंद केले जाईल, असे त्यात सूचित करण्यात आले होते. तरीही काही विद्यापीठांनी एम.फिल अभ्यासक्रम सुरू ठेवला असून, त्यामुळे त्यांना यूजीसीने इशारा दिला आहे. एम.फिल अभ्यासक्रम स्वत:ची शान हरवून बसला आहे. महाविद्यालये, विद्यापीठात प्राध्यापक होण्यासाठी एम.फिल अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असल्याची अट १९९०च्या दशकापासून होती.
एम.फिल व पीएच.डी.मध्ये फरक काय?
मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एम.फिल हा प्रगत पदव्युत्तर अभ्यासक्रम गणला गेला होता. त्यात विद्यार्थ्याने संशोधन करण्याला महत्त्व आहे. एम.फिल केलेला विद्यार्थी पीएच.डी. करण्यास योग्य असल्याचे मानले जात होते. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.फिल करता येते. एम.फीलचा अभ्यासक्रम एक ते दोन वर्षे कालावधीत पूर्ण करता येत असे, तर पीएच.डीला ३ ते ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. एम.फीलसाठी सादर करावयाचा शोधनिबंध पीएच.डी.च्या शोधनिबंधापेक्षा तुलनेने कमी असतो.
शिक्षण धोरणात काय म्हटले आहे?
उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लवचिक धोरण ठेवू शकतात. ज्यांनी दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये दुसरे वर्ष हे पूर्णपणे संशोधनासाठीच असायला हवे. ज्यांनी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास पाच वर्षे कालावधीचा पदवी/पदविका अभ्यासक्रम सुरू करता येईल. पीएच.डी. करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधनासहित चार वर्षे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. असे झाल्यास एम.फिल अभ्यासक्रम रद्द करावा.