मदनलाल धिंग्रा स्मृतिदिन
By Admin | Published: August 17, 2016 10:56 AM2016-08-17T10:56:40+5:302016-08-17T10:57:23+5:30
क्रांतिकारम मधन धिंग्रा यांचा आज (१७ ऑगस्ट) स्मृतीदिन.
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १७ - "माझ्या एका रक्ताशिवाय आपल्या मातेला अर्पण करण्यासाठी माझ्याजवळ दुसरे काहीही नाही. जोपर्यंत भारतमाता स्वतंत्र होत नाही; तोपर्यंत वारंवार भारतात माझा जन्म व्हावा. मी वारंवार भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करू इच्छितो." असे सांगणार्या मदनलाल धिंग्राचा जन्म पंजाबमधील अमृतसर शहरात झाला. त्याचे वडील एक श्रीमंत नामांकित डॉक्टर होते. शिवाय "इंग्रज म्हणजे ईश्वर" असे मानणार्यांपैकी होते.
लहानपणापासूनच मदनलाल चपळ तसेच अभ्यास व खेळ यात तरबेज होते. 'पदवी परीक्षा झाल्यावर इंग्लंडला जाऊन इंजिनीयर व्हायचे' हे मदनलालचे स्वप्न होते. पण त्यासाठी वडिलांकडे पैसे मागावे लागू नयेत म्हणून त्यांनी काहीकाळ काश्मीरला जाऊन नोकरी केली. आणि नंतर जुलै १९०६ मध्ये ते इंग्लंडला शिक्षणासाठी रवाना झाले. भारी किंमतीचे कपडे, प्रसाधने, अत्तरे वापरावीत; मित्र-मैत्रिणींच्या सहवासात गप्पाविनोद करावेत; लांबलांब फिरायला जावे या गोष्टी त्याकाळी मदनलालला पुष्कळ आवडत असत.
इंग्लंडला असताना एकदा सहज फिरायला गेला असताना त्याला इंडिया हाऊसच्या आसपास बॅरिस्टर सावरकरांचे भाषण ऐकायला मिळाले आणि मदनलाल पार बदलून गेला. त्याचे रक्त उसळले. देश स्वतंत्र करण्यासाठी काहीतरी करावे यासाठी त्याचे मन तडफडू लागले. सावरकर त्याच्या हृदयाचे सम्राट बनले. मदनलाल धिंग्रामध्ये शारिरिक कष्ट सहन करण्याची अफाट क्षमता होती. मदनलालची परीक्षा घ्यावी या हेतूने एकदा त्याला त्याच्या मित्रांनी हाताचा पंजा टेबलावर ठेवायला सांगितले. आणि एक जाड सुई त्या हाताच्या पंजावर खुपसायला मित्रांनी सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे हाताच्या तळव्याच्या आरपार सुई घुसून ती टेबलात रुतू लागली तरी मदनलालच्या चेहर्यावर वेदनेचे कोणतेच चिन्ह नव्हते. टेबलावर रक्ताचे थारोळे साचले तरी मदनलाल शांतच होता.
बॅरिस्टर सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांना 'काळ्या पाण्याची शिक्षा' झाली हे कळताच मदनलालचे रक्त उसळले. या घटनेचा सुड म्हणून मदनलालने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात असलेल्या कर्झन वायलीचा खून करण्याचे ठरविले. कर्झन वायली हे मदनलालच्या वडिलांचे अगदी जवळचे मित्र होते. गुप्त बातम्या सांगण्याचे नाटक करून मदनलालने त्यांचा विश्वास संपादन केला जुलै १९०९ रोजी एका समारंभात मदनलालला वायलींच्या खूनाचा बेत पूर्ण करायचा होता.
सावरकरांना त्याने आपला हा बेत सांगितला. एक चांगले पिस्तूल खरेदी केले. आणि एका संध्याकाळी पंजाबी पद्धतीचा निळसर फेटा, शानदार सूट, टाय, डोळ्याला काळ्या रंगाचा चष्मा आणि कोटाच्या खिशात एक रिव्हॉलव्हर, दोन पिस्तुले, दोन चाकू ठेऊन मदनलाल समारंभाला उपस्थित राहिला. रात्री दहानंतर कर्झन वायलींचे आगमन झाले. आणि अकरा वाजता ते परत जाऊ लागले. जाताना मदनलाल आणि वायलींची नजरभेट झाली. " हॅलो " असे म्हणत कर्झन वायली पुढे झाले. काही गुपित सांगण्याची बतावणी करून मदनलालही त्यांच्या अगदी जवळ गेला. आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच खिशातून रिव्हॉलव्हर काढून मदनलालने वायलींवर गोळ्या झाडल्या. एक मोठी किंकाळी मारून कर्झन जमिनीवर पडले. तरी मदनलाल शांत उभा राहिला. तेथून पळून जाण्याची त्याने कोणतीही धडपड केली नाही. एवढा भीषण खून करूनही विजयाचे समाधान त्याच्या चेहर्यावर दिसत होते. भारताच्या स्वातंत्र्याचा एक विरोधक त्याने संपवला होता. पोलिसांनी मदनलालला पकडले. त्याच्यावर खटला भरण्यात आला. तेंव्हा न्यायालयात मदनलाल म्हणाला "आमच्या मातृभूमीवर आपले अमंगल पाय ठेवणार्यांची हत्या करणे हेच योग्य आहे. मला अवश्य फाशी द्या. कारण त्यामुळे माझ्या देशवासीयांच्या अंतःकरणात सूडाची भावना भडकू शकेल." १७ ऑगस्ट १९०९ रोजी मदनलालला फासावर लटकवण्यात आले. हातात गीता आणि ओठात रामकृष्णाचे नाव घेऊन देशप्रेमाने भरलेला तो देशभक्त हसत हसत फाशी गेला.
सौजन्य : ईंटरनेट