गटबाजीमुळे मनसेची वाताहत

By admin | Published: September 25, 2014 01:25 AM2014-09-25T01:25:40+5:302014-09-25T01:25:40+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते आजतागायत ठाण्यात पक्षाची घडी बसण्याऐवजी अंतर्गत गटबाजी आणि पदांच्या हव्यासापोटी ती विस्कटलेलीच आहे

Mada's catastrophe due to straining | गटबाजीमुळे मनसेची वाताहत

गटबाजीमुळे मनसेची वाताहत

Next

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते आजतागायत ठाण्यात पक्षाची घडी बसण्याऐवजी अंतर्गत गटबाजी आणि पदांच्या हव्यासापोटी ती विस्कटलेलीच आहे. गटबाजीमुळे अनेक दिग्गजांनी यापूर्वीच पक्षाला रामराम ठोकला आहे. परंतु, असे असले तरी यातून बोध घेण्याऐवजी ठाण्यात मनसेची वाताहत होताना दिसत आहे.
सोमवारी घडलेल्या घटनेनंतर केवळ पदाच्या हव्यासापायी काही कार्यकर्त्यांनी पक्षातीलच इतर पदाधिकाऱ्यांशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही त्यांच्याविरोधात पक्षाने कोणतीही भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेतील पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा उघड झाल्याने त्याचे भोग येत्या काळात भोगावे लागण्याची चिन्हे आहेत.
अगदी सुरुवातीच्या काळातही नवीन असूनही पक्षाकडे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी होती. त्यात तरुणवर्गाचे प्रमाण मोठे होते. परंतु, ठाण्यातील या मनसेला सुरुवातीच्या काळापासूनच गटबाजीचे ग्रहण लागले होते. २००७ साली मनसेत दाखल झालेले ज्येष्ठ नेते सतीश प्रधान हेही या गटबाजीपासून लांब राहिले नाहीत. शेवटी, या गटबाजीला कंटाळूनच त्यांनी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत तर पक्षातील गटबाजीपायीच ठाणे विधानसभा क्षेत्रात हातातोंडाशी आलेला मनसेचा विजय हिरवला होता.
त्यानंतरही पक्षातील हे अंतर्गत राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही. प्रत्येक गटाची वेगळी आंदोलने, वेगळे कार्यक्र म यामुळे पक्षात एकसूत्रता येत नव्हती. त्यामुळे पक्षाची ताकद असतानाही केवळ गटबाजीमुळे मनसेला येथे यश कठीण झाले आहे. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला मिळालेली सव्वा लाखाच्या वरची मते त्यांची ताकद दाखवणारी होती. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत तर ठाणे महापालिकेच्या हद्दीतील चार विधानसभेच्या जागांपैकी ठाणे शहर आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघांत तर मनसेच्या उमेदवाराने काँग्रेसला पिछाडीवर टाकून दुसऱ्या क्र मांकाची मते घेतली होती. यावरून पक्षाच्या ताकदीचा अंदाज येत होता. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर राजन राजे यांनीही पक्षाशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली. एकीकडे नवे मतदार पक्षाकडे आकर्षित होत असताना दुसरीकडे पक्षातील स्थानिक नेत्यांचे आपसातील कुरघोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तिकीटवाटपावरून जो वाद आणि स्थानिक नेत्यांचे जे राजकारण झाले, त्याचा फटका पुन्हा एकदा पक्षाला बसला आणि संधी असूनही त्यांचे केवळ सात नगरसेवक निवडून आले.
यानंतर पक्षात अनेक बदल झाले़ निलेश चव्हाण यांच्याकडे शहर अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली. तर मुंबई मनपामधील नगरसेवक गिरीश धानुरकर यांच्याकडे संपर्क अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी केली जात असतानाच पक्षातीलच काही विघ्नसंतोषी पदाधिकारी केवळ स्वत:चा फायदा कसा होईल, या दृष्टीने पक्षातच अंतर्गत कुरघोडीचे राजकारण करून आपले पद कसे शाबूत राहील, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे ठाण्यात मनसेची वाताहत सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mada's catastrophe due to straining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.